शीतदहीच्या पूजनाने कापूस वेचणीला प्रारंभ
By admin | Published: September 24, 2015 02:37 AM2015-09-24T02:37:17+5:302015-09-24T02:37:17+5:30
पावसाची उघाड : कापूस वेचणी सुरू करण्यापूर्वी झाडांना पाळणा लावून पूजनाची परंपरा
विजय माहुरे सेलू
खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारे पांढरे सोने उगविण्यास सुरुवात झाली आहे. कापसाची वेचणी सुरू करण्यापूर्वी कपाशीची पूजा केली जाते. याला शीतदही असे संबोधले जाते. सेलू शिवारात सर्वत्र शीतदही पूजनाने कापूस वेचणीला प्रारंभ झाल्याचे दिसत आहे.
तालुक्यात ठिंबक व तुषार सिंचनाखाली बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली होती. पावसाने साथ दिल्याने कपाशीचे पीक सध्यस्थितीत समाधानकारक आहे. पण अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील कापूस ओलाचिंब झाला होता. पण त्यानंतर पावसाने उघाड देऊन उन्ह तापण्यास सुरूवात झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरूवातीला फुटलेल्या बोंडाचा कापूस घरी यावा यासाठी कापूस वेचणी सुरू केली आहे. प्रथमच कापूस वेचणी करताना कपाशीचे पूजन केले जाते. याला शीतदही म्हणतात. दोन झाडांच्या मध्ये आंबाडीच्या सालीच्या सहाय्याने पाळणा बांधला जातो. त्याच्या दोनही बाजूने बारीक गोटे ठेवून देणार व घेणार म्हणून पूजा केली जाते. काडीचा जरातूही लावला जातो. या पूजनानंतर दहीभात शेतात शोंपून कापूस वेचणीस प्रारंभ होतो. ही परंपरा आजही सर्वत्र जपली जाते.