जिल्हा परिषदेच्या ९७२ शाळांना तंबाखूमुक्तीकरिता समुपदेशन
By admin | Published: March 18, 2017 01:13 AM2017-03-18T01:13:38+5:302017-03-18T01:13:38+5:30
भारतात दररोज २ हजार ५०० लोकांचा मृत्यू तंबाखूच्या सेवनाने होतो. तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतातील आहे.
वर्धा जिल्हा ठरू शकतो जगातील दुसरा तंबाखूमुक्त जिल्हा
पुलगाव : भारतात दररोज २ हजार ५०० लोकांचा मृत्यू तंबाखूच्या सेवनाने होतो. तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतातील आहे. या निष्कर्षावरुन तंबाखूमूक्त शाळेची संकल्पना पुढे आली. नव्या पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९७२ जि.प. शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियानात समुपदेशन करण्यात येत आहे.
वयाच्या १८ वर्षानंतर तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तंबाखूमुक्त शाळा अभियानात या शिक्षणसंस्थांनी तंबाखूमुक्त अभियानाचे ११ निकष पूर्ण केले तर वर्धा जिल्हा जगातील दुसरा तंबाखूमुक्त जिल्हा ठरणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली असून आरोग्य केंद्र परिसरात तंबाखूमुक्त मोहिमेचे फलक लावले आहे. सर्व शाळांमधून ही मोहीम सक्रीयपणे राबविल्या गेली तर वर्धा जिल्हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तंबाखूमुक्त जिल्हा ठरणार आहे, असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुविरसिंह दिदावत यांनी व्यक्त केले.
तंबाखूमुक्त शाळेचे शिक्षण संस्थांना दिलेल्या ११ निकषापैकी निकष क्र. ७ व ८ हे आरोग्य विभागाशी निगडीत आहे. आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये ६ ते १० मार्च पर्यंत हे तंबाखूमुक्त अभियान राबविण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक यांचेमार्फत जिल्हा परिषद शाळात तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायद्यावर उद्बोधन करण्यात येत आहे. शाळेच्या नोंदवहीत याची नोंद करण्यात येईल. तालुक्यातील आरोग्य केंद्रात ही मोहीम आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत राबविण्यात येत आहे. नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१ जि.प. शाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर ताम्हणकर, डॉ. अमरदीप नंदेश्वर, डॉ. विश्वदर्षिनी यादव यांच्या राबविले. आरोग्य केंद्र सहाय्यक प्रशांत आदमने, शरद डांगरे यांनी समुपदेशन केले.(तालुका प्रतिनिधी)