राज्य परिवहन महामंडळात नेमले जाणार समुपदेशक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:56 PM2018-01-03T15:56:15+5:302018-01-03T15:56:44+5:30
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी विशेषत: चालकांवर प्रवासी बस चालविताना सतत मानसिक त्रास येत असल्याने त्याची परिणीती गंभीर प्रसंगामध्ये होवू शकते. हे टाळण्याच्या उद्देशाने चालकाचे समुपदेशन करण्यासाठी ३, ४ आगारांकरिता समुपदेशन मानधन तत्वावर नेमण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी विशेषत: चालकांवर प्रवासी बस चालविताना सतत मानसिक त्रास येत असल्याने त्याची परिणीती गंभीर प्रसंगामध्ये होवू शकते. हे टाळण्याच्या उद्देशाने चालकाचे समुपदेशन करण्यासाठी ३, ४ आगारांकरिता समुपदेशन मानधन तत्वावर नेमण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
समुपदेशक तीन ते चार आगारांकरिता एक या पध्दतीवर राहणार असून प्रत्येक आगारास महिन्यातून तीन भेटी ते देणार आहेत. यात चालक पदातील कर्मचाऱ्यांशी व्यक्तीगत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दुर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. १ वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती राहणार असून त्यानंतर त्यांना त्यांच्या कामानुसार वाढ देण्याबाबत विचार केला जाणार आहे. संपूर्ण राज्यात ६३ समुपदेशक नेमले जाणार आहे. या समुपदेशकांना चार हजार रूपये मानधन व वर्ग एकच्या अधिकाऱ्याला लागू असलेला दैनिक भत्ता दिला जाणार आहे. शिवाय जाण्या-येण्याकरिता राज्य परिवहन महामंडळातून मोफत पास मिळणार आहे. राज्यात मुंबई विभागात ५ आगाराला १ पालघर, ठाणे, रायगड येथे ८ आगाराला प्रत्येकी २ समुपदेशक नियुक्त केले जाणार आहे. याशिवाय रत्नागिरी येथे ९ आगारासाठी २, सिंधुदुर्ग येथे ७ आगारासाठी २, नाशिक येथे १३ आगारासाठी ४, धुळे येथे ९ आगारासाठी २, जळगाव, अहमदनगर येथे प्रत्येकी ११ आगारासाठी ३, ३ समुपदेशक नेमले जाणार आहे. पुणे येथे १२ आगारासाठी ३, सागंली येथे १० आगारासाठी २, सातारा येथे ११ व कोल्हापुर येथे १२ आगारासाठी प्रत्येकी ३ समुपदेशक नेमले जाणार आहे. याशिवाय सोलापुर, औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा, नागपूर विभागात प्रत्येकी २, लातुर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली येथे प्रत्येकी १ समुपदेशक नेमले जाणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातंर्गतही एक समुपदेशक नेमण्याची प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. या दृष्टीकोणातून अर्ज मागविण्यात येत आहे. या समुपदेशकांचा कालावधी एक वर्षाचा राहणार असून ते परिवहन महामंडळाच्या आगारांमधील चालक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतील व त्यांच्या अडचणी समजून घेतील.
- राजेश अडोकार, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, वर्धा.