समुपदेशक, कम्युनिटी पोलिसिंगवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:00 AM2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:02+5:30
कोरोनाच्या संकटाने पोलिसांच्या कामालाही एक नवा आयाम मिळवून दिला. आता विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागेल. यात संवेदनशिलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक सलोखा राखत परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्यपूर्ण काम पोलिसांना करावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कायदा व सुव्यवस्था...गुन्ह्यााचा तपास... बंदोबस्त...वाहतुकीचे व्यवस्थापन आणि कायद्याबाबतचे प्रबोधन...हे म्हणजे पोलिसिंग... असेच आतापर्यंत रूढ झाले होते. मात्र, कोरोनाच्या संकटाने पोलिसांच्या कामालाही एक नवा आयाम मिळवून दिला. आता विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागेल. यात संवेदनशिलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक सलोखा राखत परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्यपूर्ण काम पोलिसांना करावे लागणार आहे.
येणाऱ्या संकटकाळात कर्मचाऱ्यांनी खचून न जाता आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी मंगळवारी रात्री आर्वीनाका परिसरात पोलीस दलासह महसूल, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना आरोग्यदायी साहित्य वापरूनच रस्त्यावर उतरावे, तसेच स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
कायदा, सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे मोडून काढायचे. गुन्हे सिद्धता प्रमाणात वाढ होईल यासाठी प्रयत्न करायचे. सण, उत्सव शांततेत उत्साहात साजरे व्हावे, यासाठी बंदोबस्त, सामाजिक सलोखा राखणे, निवडणुका, सभांचा बंदोबस्त करायचा. महापूर काळात नागरिकांसह प्रशासनाला आवश्यक ती मदत करायची, असे पोलिसिंग सर्वांनीच पाहिले आहे. पण, कोरोनाचं संकट देशावर आले. एक दोन नव्हे तर तब्बल ४५ दिवसांपासून शहरातील पोलिसांची व्याख्याच बदलत गेली. गुन्हेगारीवर वचक ठेवणाऱ्या पोलिसांना आपल्या कामात मोठे बदल करावे लागले. अहोरात्र रस्त्यावर बंदोबस्त करताना नागरिकांच्या मनातील भीती दूर करायची. संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करू नका, असे त्यांचे वारंवार प्रबोधन, आवश्यक त्या ठिकाणी कारवाई, प्रबोधनाचे साधन अधिक वापरणे, पण, हे करताना कायदा, सुव्यवस्थेचा, सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेता पोलीस कर्तव्य बजावताना दिसत आहेत. जिल्ह्यात मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा रस्त्यावर आली. मागील ४५ दिवसांपासून २४ तास ऑन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी त्यांचे समुपदेशन केले. आर्वीनाका चौकात संपूर्ण पोलीस दल, वाहतूक शाखेचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर तसेच फेसशिल्ड आदी आरोग्यविषयक यंत्रणा बाळगूनच काम करण्याचा सल्ला दिला. तुम्ही सुरक्षीत तर नागरिक सुरक्षीत असे सांगून त्यांचे मनोबल उंचावले. तसेच त्यांच्या कार्याला सलाम करीत अजून लांब लढाई लाढायची असल्याने तुम्ही सुरक्षीत राहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार प्रीती डुडुलकर, रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक, शहर ठाणेदार योगेश पारधी, वाहतूक शाखेचे अशोक चौधरी, आरोग्य विभागातील कर्मचारी, नगर पालिकेचे कर्मचारी, डॉ. सचीन पावडे आदींची उपस्थिती होती.
कर्मचाऱ्यांना दिल्यात सूचना
पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत अतिदक्ष राहण्याच्या सूचना एसडीपीओ जगताप यांनी केल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझर जवळ ठेवणे, मास्क शिल्ड वापरणे, नागरिकांच्या सुरक्षेचा भार पोलीस, आरोग्य, महसूल, नगर पालिका कर्मचाऱ्यांच्याच खांद्यावर असल्याने तुम्ही सुरक्षीत राहणे गरजेचे आहे, असे सांगत आवश्यक सूचना त्यांनी केल्या.
‘खाकी’तील ‘वॉरिअर्स’ऑनड्युटी २४ तास
लहान मुले, वयस्कर आई-वडील, सासू-सासरे, पती यासर्वांना सोडून महिला पोलीस कर्मचारी कोरोनाला हरविण्यासाठी मैदानात आहेत. कुणी गस्त घालत आहे, कुणी भर उन्हात चौकात पहारा देत आहे, तर कुणी कंट्रोल रूममध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. स्वत:चं कुटुंब विसरून या महिला ‘वारिअर्र्स’ गेल्या दीड महिन्यांपासून कर्तव्य बजावत आहेत.
समुपदेशनासह निर्णयक्षमता
पोलिसिंगमधील शेवटचा घटक हा रस्त्यावर बंदोबस्तासाठी असतो. त्याच्याकडे सामाजिकतेचे भान असावे, त्याच्याकडे जागेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी. तसेच गरज भासेल त्यावेळी पोलिसिंग करता करता समाजाचे समुपदेशन करण्याचे कौशल्यही असण्याची गरज आहे.
मजूर कामगारांची काळजी
सामाजिकतेचे भान ठेवून संसर्ग काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात सर्वात जास्त हाल हे कामगारांचे आणि परप्रांतीय कामगार घटकांचे होतात. त्यांना आपल्या गावी जाता येत नाही, हाताला काम नसल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण होतो. आता पोलिसांना अशा घटकांसाठीही काम करावे लागणार आहे.