देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:27 PM2018-02-22T22:27:53+5:302018-02-22T22:28:06+5:30
शासनकर्ते सांगतात त्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था अजिबात सुदृढ नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वसामान्यांवर त्याचा विपरित प्रभाव पडत आहे, असे मत अभ्यासक, शेतकरी नेते, विदर्भवादी व माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : शासनकर्ते सांगतात त्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था अजिबात सुदृढ नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वसामान्यांवर त्याचा विपरित प्रभाव पडत आहे, असे मत अभ्यासक, शेतकरी नेते, विदर्भवादी व माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार आणि भरत ज्ञान मंडळ, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित आधारवड व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर, आधारवडचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव चंद्रशेखर दंढारे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सर्व सेवा संघाचे प्रसादजी उपस्थित होते.
यावेळी वामनराव चटप यांनी आकडेवारीतून आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला. पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी नोकरभरती बंदच आहे. रोजगाराच्या संधी सतत दडपत असून बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. घाट्यातील शेती, नोकऱ्यांचा अभाव, आयात-निर्यातीचे बिघडलेले संतुलन यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी एकतर आत्महत्येचा किंवा शहराकडे पलायनाचा मार्ग स्वीकारत आहेत. परिणामी शहराची भरमसाठ वाढ होत आहे. एकट्या मुंबई शहरात लोकसंख्येच्या ५५ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत ओंगळवाणे जीवन जगण्यास बाध्य आहे. कारण शहर वाढतात त्याप्रमाणात मुलभूत सुविधा नसतात, परिणामी रोगराईचे प्रमाण वाढत आहे. भांडवलशाहीतील भोगवादी प्रवृत्तीच्या आकर्षणामुळे वहावत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे कार्य यापुढे ज्येष्ठ नागरिकांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विदर्भाचे नष्टचर्य संपवावयाचे असेल तर विदर्भाचे वेगळे राज्य हाच एकमेव उपाय आहे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला वामनराव चटप यांचा संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून भरत ज्ञान मंडळीचे सदस्य अरूण काशीकर यांनी सत्कार केला.
अॅड. मोहन देशमुख यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि सद्यस्थिती या विषयावर भूमिका मांडली. वक्त्यांचा परिचय पांडुरंग भालशंकर यांनी दिला. सूत्रसंचालन चंद्रशेखर दंढारे यांनी केले तर जिल्हा संघटक शेखर सोळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्यामकांत देशपांडे, हरीष तांदळे, माजी आमदार सरोज काशीकर, रवी काशीकर, मदन मोहता, व्ही.एम. देशमुख, पुरुषोत्तम पोफळी, गुणवंत डखरे, डॉ. एरकेवार, शेषराव बीजवार, बी.वाय. बागदरकर, अॅड. एन.जे. भोयर, अॅड. अशोक वाघ, प्रा. अनिल दुबे, संजय इंगळे तिगावकर, मनोहर पंचरिया, शेतकरी संघटना, कामगार संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, परिषद तसेच शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अप्रत्यक्ष कराचा बोजा सामान्यांवर
देशातील ७३ टक्के संपत्ती फक्त एक टक्का लोकांजवळ अर्थात कार्पोरेट घराण्यांकडे केंद्रीत झाली आहे. मात्र हा वर्ग ५० टक्के अप्रत्यक्ष करांपैकी फक्त एक टक्काच कर भरतो. देशातील ९९ टक्के लोकांच्या वाट्याला केवळ २७ टक्के संपत्ती आलेली असून ४९ टक्के अप्रत्यक्ष कराचा भार त्यांच्यावर पडत आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेचे धोरण असले तरी भारतात भांडवलवादी अर्थव्यवस्था असल्याचे चटप यांनी स्पष्ट केले.