तांत्रिक विषयाचे अभ्यासक्रम सुरू होणार
By admin | Published: December 30, 2016 12:34 AM2016-12-30T00:34:27+5:302016-12-30T00:34:27+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठामध्ये तांत्रिक विषयाचे अभ्यासक्रम लवकरच सुरू केले जातील.
महेंद्रनाथ पांडे : हिंदी विद्यापीठाचा १९ वा स्थापना दिन समारंभ
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठामध्ये तांत्रिक विषयाचे अभ्यासक्रम लवकरच सुरू केले जातील. हिंदी विद्यापीठाचा उद्देश भाषा व साहित्यापर्यंतच मर्यादित न ठेवता विज्ञान, तंत्रज्ञानापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय मानस संसाधन विकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या १९ व्या स्थापना दिन समारंभाचे गुरूवारी राज्यमंत्री डॉ. पांडे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री पूढे म्हणाले की, आज संशोधनाचे युग आहे. आपल्याला नवीन विषय पाहिजे. तंत्रज्ञानावर आधारित विषय हवे आहेत. हिंदी भाषेत अर्थाजन करण्याची शक्ती आहे. मध्य प्रदेश येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू झालेल्या विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रनिकेतन अभ्यासक्रम हिंदीमध्ये शिकविले जातात. यात कुठल्याही अडचणी येत नाहीत. हा प्रयोग वर्धा या महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पावन भूमितही राबविला जाऊ शकतो. विद्यापीठाच्या अर्धवट कामांना ते पूर्ण करतील आणि हिंदीच्या प्रचार, प्रसाराकरिता शक्य ती मदत करू, अशी ग्वाही डॉ. पांडे यांनी दिली.
अध्यक्षस्थानाहून बोलता कुलपती प्रा. गिरीश्वर मिश्र यांनी, कुलाधिपती यांच्याकडे या विद्यापीठामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता प्रस्ताव दिला आहे. तो मंजूर होताच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांना प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विद्यापीठात सक्षम, आचार्य आदी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. याद्वारे भाषा तंत्रज्ञानाच्या विकासाचे कार्य केले जात असल्याचे ते म्हणाले.
विद्यापीठासाठी १९ वर्षे हा कार्यकाळ अल्प
वर्धा : विद्यापीठासाठी १९ वर्षे हा कार्यकाळ अल्प असतो. देशातील आॅक्सफोर्ड, कँब्रीज विद्यापीठांना शेकडो वर्षे झाली आहेत. भारतात त्यापूर्वीही विद्यापीठांचा इतिहास आहे, असे प्रा. मिश्र यांनी सांगितले.
विशेष वक्ता डॉ. इंद्रनाथ चौधरी यांनी, हिंदी ही लोकभाषा असून ती शक्तीची बनण्याच्या प्रयत्नात नाही. यामुळे भोजपुरी, अवधी, राजस्थानी या भाषांना दर्जा मिळाला तर हिंदी कमजोर होईल, ही शंका घेण्यात अर्थ नाही, असे सांगितले. यावेळी विद्यापीठाकडून गैर हिंदी भाषिकांच्या हिंदीची सेवा केल्याबद्दल गौरव करण्यात आला. यात गुजराती भाषिक हिंदीच्या प्रा. रंजना अर्गड़े, कन्नड़चे प्रा. टी.आर. भट्ट, मराठी भाषिक चंद्रकांत पाटील, बांग्ला भाषिक अमिताभ शंकर राय चौधरी यांना ‘हिंदी सेवी सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समारंभाला प्रतिकुलपती डॉ. आनंद वर्धन शर्मा, कुलसचिव डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र, डॉ. हनुमानप्रसाद शुक्ल, मनोज कुमार, डॉ. देवराज, प्रा. एल. कारूण्यकरा, प्रा. के.के. सिंह यासह अन्य प्राध्यापक उपस्थित होते. प्रारंभी विद्यापीठाचे कुलगीत, महात्मा गांधींचे भजन वैष्ण व जन तो तेने कहिए सादर करण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)