‘कोविड व्हॅक्सिनेशन’मध्ये मध्यमवयीनांनी ज्येष्ठांना सोडले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 10:08 PM2021-06-12T22:08:43+5:302021-06-12T22:09:10+5:30
शुक्रवारी ४५ ते ६० वयोगटातील मध्यमवयीनांनी ६० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना मागे सोडले आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३ हजार ४०१ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १७ हजार ३४७ लाभार्थींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील १ लाख ३ हजार ९३७ व्यक्तींनी लसीचा पहिला तर २५ हजार ६७९ लाभार्थींनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेने शुक्रवारी २.४३ लाखांचा उंबरठा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ६११ व्यक्तींना कोविड व्हॅक्सिनचा पहिला तर ६१ हजार ८५७ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारी ४५ ते ६० वयोगटातील मध्यमवयीनांनी ६० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना मागे सोडले आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३ हजार ४०१ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १७ हजार ३४७ लाभार्थींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील १ लाख ३ हजार ९३७ व्यक्तींनी लसीचा पहिला तर २५ हजार ६७९ लाभार्थींनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४५३ फ्रंटलाइन वर्कसनी कोविड व्हॅक्सिनचा पहिला तर केवळ ५ हजार ७९० लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. एकूणच फ्रंटलाइन वर्कर्स लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत उदासीन असल्याचे बघावयास मिळत आहे. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्समध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.
विदेशात जाणाऱ्यांना दिली जातेय कोविशिल्ड
- जिल्ह्यात सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविडच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देणे बंद असले तरी त्याला विदेशात जाणारे हे अपवाद ठरत आहे. शिक्षणासह नोकरीसाठी विदेशात जात असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. त्यासाठी नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या शिफारशीअंती आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील सात व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.
१,५४४ तरुणांनी घेतला लसीचा दुसरा डोस
- शासनाच्या सूचनेनुसार मध्यंतरी जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना कोविडच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला; पण नंतर लस तुटवड्यामुळे या वयोगटातील व्यक्तींना लसीचा पहिला डोस देणे बंद केले, तर सध्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या व मुदत संपत असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीचा दुसरा डोस दिल्या जात आहे. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल १ हजार ५४४ व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.