बचत गटाच्या कोविड योद्धा महिलांचा गृहअलगीकरणातील ‘ॲक्टिव्ह’ कोरोना बाधितांवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 10:37 PM2021-04-02T22:37:00+5:302021-04-02T22:37:37+5:30
जिल्ह्यात सध्या १ हजार ६०० हून अधिक ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी लक्षणविरहित तसेच कोविडचे सौम्य लक्षणे असलेल्यांना आरोग्य विभागाने गृहअलगीकरणात ठेवले आहे, तर गंभीर रुग्ण सध्या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. गृहअलगीकरणात असलेल्या काही कोरोनाग्रस्तांकडून गृहअलगीकरणाच्या नियमांना बगल दिली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने या व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याच्या सूचना वर्धा नगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गृहअलगीकरणात असलेल्या कोरोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी वर्धा नगरपालिका प्रशासन बचत गटाच्या महिलांचे सहकार्य घेत आहे. या महिलांनी पहिल्या फळीतील कोविडयोद्धांची भूमिका निभवित अल्पावधीतच तब्बल १ हजार २० ॲक्टिव्ह संक्रमितांच्या घरी भेट देऊन त्यांना गृहअलगीकरणाच्या नियमांचे पालन स्वत:सह समाजातील इतर नागरिकांसाठी कसे उपयुक्त आहे, हे पटवून दिले आहे.
जिल्ह्यात सध्या १ हजार ६०० हून अधिक ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी लक्षणविरहित तसेच कोविडचे सौम्य लक्षणे असलेल्यांना आरोग्य विभागाने गृहअलगीकरणात ठेवले आहे, तर गंभीर रुग्ण सध्या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. गृहअलगीकरणात असलेल्या काही कोरोनाग्रस्तांकडून गृहअलगीकरणाच्या नियमांना बगल दिली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने या व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याच्या सूचना वर्धा नगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून गृहअलगीकरणात असलेल्या वर्धा शहरातील ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांचे सहकार्य सध्या वर्धा नगरपालिका घेत आहे. आरोग्य विभागाकडून गृहअलगीकरणात असलेल्या ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची यादी येताच पहिल्या फळीतील कोविडयोद्धांप्रमाणे या महिला ‘ॲक्टिव्ह मोड’वर येत गृहभेटी देत असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षकांच्या तीन चमू
गृहअलगीकरणाचा नियम मोडून घराबाहेर फिरणाऱ्या ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांवर दंडात्मकसह फौजदारी कारवाई करण्यासाठी वर्धा नगरपालिका प्रशासनाने शिक्षकांच्या तीन चमू तयार केल्या आहेत. गृहअलगीकरणाचा नियम मोडणाऱ्या एकाही व्यक्तीवर या चमूने कारवाई केली नसली तरी माहिती मिळताच या विशेष चमू ‘ॲक्टिव्ह मोड’वर येत असल्याचे सांगण्यात आले.
एका दिवशी किमान ५० गृहभेटी
गृहअलगीकरणात असलेल्या ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सध्या महिला बचत गटाच्या दहा महिलांची निवड वर्धा नगरपालिका प्रशासनाने केली आहे. प्रत्येक महिला दरदिवशी गृहअलगीकरणातील किमान ५० ॲक्टिव्ह कोरोनाबाधितांच्या घरी भेट देतात.
प्रत्येक दिवशी दिली जातेय भेट
गृहअलगीकरणात असलेल्या व्यक्तींच्या घरी या महिला दररोज भेट देऊन गृहअलगीकरणात असलेला व्यक्ती घरीच थांबत आहे की घराबाहेर पडतो, याबाबतची माहिती घेतात. सध्या दहा महिलांचे सहकार्य वर्धा नगरपालिका घेत आहे.
केवळ ३०० रुपये मानधन
गृहअलगीकरणात असलेल्या ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी निवड करण्यात आलेल्या महिलांना ३०० रुपये इतके नाममात्र मानधन दिले जात आहे.