कोट्यवधीच्या विकासकामांना अल्पावधीत तडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:26 PM2019-07-04T21:26:45+5:302019-07-04T21:27:06+5:30
शहरातील विकास कामांकरिता नगरपालिकेला १० कोटी रुपयाचा विशेष निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामे केली जात असून ही कामे नियमबाह्य तसेच सदोष असल्याने निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : शहरातील विकास कामांकरिता नगरपालिकेला १० कोटी रुपयाचा विशेष निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामे केली जात असून ही कामे नियमबाह्य तसेच सदोष असल्याने निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा यांच्या माध्यमातून शहरात १० कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहे. या निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील सेलडोह-सिंदी-कांढळी रस्ता व राज्य मार्ग ३३० ते माता मंदिर या रस्त्यांकरिता १ कोटी ५२ लाख ७८ हजार ३४३ रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे. हा रस्ता नदीलगत असून पूरपिडित क्षेत्रात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला नियमानुसार मोठी व उंच संरक्षण भिंत देणे आवश्यक असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराच्या हितापोटी केवळ पाच फुट उंचीचीच भिंत दाखवून कामाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली.
नदीलगतच्या पुरपिडीत क्षेत्रात नियमानुसार कुठल्याही बांधकामाकरिता तांत्रिक मंजुरी मिळत नसतानाही बांधकाम विभागाने या परिसरातील बांधकामाला मंजूरी देत या बांधकामाचा कंत्राट वर्ध्यातील कदम नामक कंत्राटदाराला दिला आहे.
या कंत्राटदाराने रस्त्यावरील विद्यूत पोल कायम ठेवूनच बांधकाम सुरु केले आहे. तसेच बांधण्यात आलेल्या नालीचाही योग्य उतार काढला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नालीच्या या उतारामुळे तेजराम नरड यांच्या घराजवळील नालीत सांडपाणी तुंंबले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या नालीतील पाणी वाहून जाण्याकरिता ठिकठिकाणी सिमेंटचे पाईप टाकण्याची गरज असताना कंत्राटदाराने सिमेंटच्या पाईपाऐवजी टिनपत्र्याचा गोल ड्रम तयार करून टाकण्यात आला. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी वाहून जात नसल्याने अडचणी वाढल्या. तसेच या नालीला आत्तापासूनच भेगा पडल्याने रस्ता व नालीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. येथील नदीवरही पुलाचे बांधकाम करण्यात आले असून त्याचीही उंची कमी असल्याने पावसाळ्यात रस्ता व पूल शेतकºयांसह नारिकांच्या किती उपयोगात येईल? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. पूर पीडित क्षेत्रातील नदीलगतच परिसर अति संवेदनशील असतानाही पुलाचे व रस्त्याचे नियमबाह्य सदोष काम होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जाणीवपूर्वक डोळेझाक ही आश्चर्यकारक असल्याने या बांधकामाची वरिष्ठांनी चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी गावकºयांकडून केली जात असून यासंदर्भात तक्रारही देण्यात येणार आहे.
कंत्राटदाराचे वराती मागून घोडे
वर्ध्यातील कदम नामक कंत्रटदाराने या कामाला सुरुवात केली असून रस्त्या व नालीचे बांधकाम करताना सुरुवातीला रस्त्यावरील विद्यूत खांब हटविणे आवश्यक होते. परंतु कंत्राटदाराने विद्यूत खांब तसेच ठेऊन कामाला गती दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने कंत्राटदाराचा वराती मागून घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु असल्याची ओरड होत आहे.