नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला तडे; वाहतूक दोन तास प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 03:25 PM2019-12-09T15:25:50+5:302019-12-09T15:26:12+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर-मुंबई या रेल्वे मार्गावरील ट्रॅकला तुळजापूर-दहेगावनजीक तडे गेल्याचे सोमवारी सकाळी आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मध्य रेल्वेच्या नागपूर-मुंबई या रेल्वे मार्गावरील ट्रॅकला तुळजापूर-दहेगावनजीक तडे गेल्याचे सोमवारी सकाळी आढळून आले. सदर घटना वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. असे असले तरी या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही तासांकरिता खोळंबली होती. माहिती मिळताच ब्रेक डाऊन चमूने घटनास्थळ गाठून दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यानंतर या मार्गवरील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तुळजापूर परिसरात रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात येताच दुरूतीची जबाबदारी असलेल्याने चमूला पाचारण करण्यात आले. दुरूस्तीचे काम पूर्णत्त्वास जाण्यास सुमारे दीड तासांच्यावर कालावधी लागल्याने विदर्भ एक्स्प्रेससह अन्य महत्त्वाच्या रेल्वे गाड्या दोन तास उशीराने धावल्या. ट्रॅक फॅक्चर झाल्याची माहिती मिळताच ब्रेक डाऊन चमूला पाचारण करण्यात आले. रेल्वे वाहतूक खोळंबल्याने याचा नाहक त्रास शाळकरी मुला-मुलींसह नोकरीसाठी जाणाऱ्या तसेच विविध कामानिमित्त नियोजित ठिकाणी जाणाºया प्रवाशांना सहन करावा लागला. ट्रॅक फॅक्चर झाल्याचा फटका विदर्भ एक्स्प्रेससह हावडा मेल, नागपूर-पूणे, नागपूर-अमरावती इंटरसिटी, आझाद हिंद एक्स्प्रेस, प्रेरणा एक्स्प्रेस यासह काही अन्य रेल्वे गाड्यांनाही बसला.
हा ट्रॅक फॅक्चर होण्याचे नेमके कारण अद्यापही कळलेले नाही. त्याच्या कारणांचा शोध घेतल्या जात आहे. सध्या रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. असे असले तरी काही गाड्या उशिराने धावत आहेत.
- अनिल वालदे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर.