गांधी विचार जनमानसात पोहचविणारा बिहारमधील अवलिया सेवाग्राममध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:35 AM2018-02-23T10:35:02+5:302018-02-23T10:36:05+5:30
सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला. भागलपूर बिहार येथील ५१ वर्षीय गांधी विजय कुमार सिंग धावक हा अविलया पारंपरिक वेषात आणि भारताचा राष्ट्रध्वज घेऊन सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी आश्रमात आला आहे.
हा अवलिया गेल्या ३५ वर्षापासून गांधीजीचे विचार, कार्य आणि भारत मातेचा जयघोष करीत राष्ट्रध्वजाचा सन्मान करा, देशाला राष्ट्रभक्तांच्या त्यागातून स्वराज्य मिळाले त्याचे स्मरण करून देशाच्या एकता, अखंडता, विकास आणि स्वच्छतेसाठी झटा असे देशात फिरून प्रबोधनाचे कार्य करीत आहे. ते स्वत:ला सर्वोदयी आणि गांधी भक्त मानतात. म्हणून त्यांनी स्वत:चे नाव गांधी विजय कुमार यादव धावक असे ठेवले. धावक हे नाव पण त्यांनी जोडले. त्या मागील कारण सांगितले ते असे की, ते शाळा, महाविद्यालयात धाव स्पर्धेत सहभागी होत असत. त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत पण भाग घेतला होता. १९९० मध्ये राजीव गांधी भागलपूरला सदभावना यात्रेसाठी आले होते. त्यात मी ही सहभागी होऊन धावलो. राजीव गांधीनी मला पाहिले व गाडीवर बोलावून गळयात हार टाकून सन्मानित केले, असे विजय कुमार यांनी सांगितले.
ते म्हणाले मी नॅशनल युथ प्रोजेक्टचे प्रमुख डॉ. सुब्बारावजी यांना खूप मानतो. त्यांच्या आणि सर्वोदयाच्या प्रत्येक शिबिरे आणि संमेलनात सहभागी होतो.
अरूणाचल प्रदेशातील दुर्गम भागात त्यांनी प्रवास केला. चंपारण्यमध्ये फिरलो आहे. भीती हा शब्द त्यांना माहित नाही.
ते म्हणाले गांधीवाद्यांनी युवकांना संधी दिली पाहिजे. गांधीवाद गावागावात पोहचला पाहिजे. तेव्हाच हा देश खऱ्या अर्थाने विकास पावेल. मी जगतो देश व तिरंग्यासाठी. म्हणूनच तिरंगा फडकवत सन्मानाने देशभर फिरत आहे.
संमेलन संपल्यानंतर ते हरियाणासाठी रवाना होणार आहे. ते अविवाहित असून जनता त्यांना आर्थिक मदत करत असते. ते एल.एल.बी झाले असून पैसा व नोकरीसाठी कधीच धडपड केली नाही.