सेवाग्राम विकासासाठी कोअर टिम तयार करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:22 AM2018-09-08T00:22:01+5:302018-09-08T00:22:37+5:30
जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने १४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्धरितीने व दर्जात्मक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची कोअर टीम तयार करावी, अशा सूचना अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने १४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्धरितीने व दर्जात्मक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची कोअर टीम तयार करावी, अशा सूचना अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेवाग्राम आश्रमाचे शेख हुसैन, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या २ आॅक्टोबर २०१९ रोजीच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित १५० कार्यक्रमांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. महात्मा गांधीजी सेवाग्राम मध्ये १०३० ते १९४८ या प्रदीर्घ कालावधीसाठी वास्तव्यास होते. या आश्रमात त्यांनी अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. त्याच्या १५० व्या जयंती निमित्ताने त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्रामचा विकास व्हावा, महात्मा गांधीजींच्या विचारांचे पाईक असलेल्या जगभरातील त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शनाचे एक उत्कृष्ट केंद्र या माध्यमातून विकसित व्हावे, यादृष्टीने सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यात आणखी कोणत्या नावीन्यपूर्ण योजना किंवा उपक्रम राबविता येतील याचा विचार केला जावा, यात लोकांची मते मागविण्यात यावीत, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मंजूर आराखड्यापैकी मार्च २०१८ पर्यंत ८५.१२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर सन २०१८-१९ या वर्षात २६.०८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या आराखड्यात अनेक उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहे.
यामध्ये सेवाग्राम परिसरामध्ये अंगुरीबागेजवळ १००० व्यक्तींसाठी सभागृह, अभ्यासकेंद्र, सुसज्ज ग्रंथालय, यात्री निवास परिसरात निवासी कॉटेजचे बांधकाम, यात्री निवास येथे ४ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, कस्तुरबा चौक ते आश्रम या रस्त्याची सुधारणा, कंपाऊंड वॉल, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे, माहिती केंद्र, बुटी बोरी जंक्शन ते वर्धा व सेवाग्राम या मार्गावर वृक्ष लागवड, सेवाग्राम, वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास, हेरिटेल ट्रेलची उभारणी, पवनार येथील दिल्ली गेट आणि परिसराचे संवर्धन अशा विविध कामांचा यात समावेश असल्याचे याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.