९८० गावात उघड्यावर होतात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:42 PM2018-02-18T21:42:00+5:302018-02-18T21:42:23+5:30
गाव तेथे स्मशानभूमी, असा निर्णय घेत शासनाने स्मशानभूमिच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात तब्बल ९०८ गावांत स्मशानभूमिची समस्या डोके वर काढून आहे.
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गाव तेथे स्मशानभूमी, असा निर्णय घेत शासनाने स्मशानभूमिच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात तब्बल ९०८ गावांत स्मशानभूमिची समस्या डोके वर काढून आहे. जिल्हा प्रशासनाकडे नोंद असलेल्या स्मशानभूमिपैकी १७७ गावांत उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार होत आहे.
स्मशानभूमी विकासाच्या शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्याला या वर्षात स्मशानभूमी विकासाकरिता ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून स्मशानभूमिचा विकास साधण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. या निधीतून जिल्ह्यातील २०४ स्मशानभूमिचा विकास साधण्यात येत आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत; पण अनेक गावांत यातील एक छदामही पोहोचला नसल्याचे दिसून आले आहे.
१३६१ गावांच्या या जिल्ह्यात होत असलेल्या कामांवरून आणि शासनाकडे असलेल्या नोंदीवरून केवळ ३८१ गावांत स्मशानभूमी असल्याचे दिसून आले आहे. यातील केवळ २०४ गावांतील स्मशानभूमिचे सौदर्यीकरण करण्यात येत आहे. याच गावांतील कामांवर आलेला निधी खर्च करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. इतर गावांत मात्र असा कुठलाही निधी देण्यात आला नसल्याचे दिसून आले आहे.
ज्या गावातील व्यक्ती आहे, त्याच गावांत मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार व्हावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. गावातील व्यक्तीच्या या अपेक्षेनुसार शहरी असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी एक स्मशानभूमी असणे अनिवार्य झाले आहे. असे असताना जिल्ह्यात स्मशानभूमिची समस्या डोके वर काढत आहे. अनेक गावांत स्मशानभूमिच्या जमिनीवरून वाद झाल्याचे दिसून आले आहे. काही गावांत तर गावाची शिव ओलांडून दुसऱ्या गावात जाऊन तेथे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. यामुळे शासनाने प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमिची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही गावांमध्ये स्मशानभूमिच्या जागेवरून वाद झाल्याचे समोर आले आहे. गावांत निर्माण होणारे हे तंटे सोडविण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अनेक गावात जमिनीची समस्या
गाव तेथे स्मशानभूमी संकल्पनेला जागेचे ग्रहण लागल्याचे दिसून आले आहे. पूर्वी काही दानशूर व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेतून स्मशानभूमिकरिता मोठ्या जमिनी दान दिल्या आहेत. तत्सम पत्रही ग्रामपंचायतीला दिले आहे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. गावांची लोकसंख्या वाढत आहे. यामुळे गावांत स्मशानभूमी गरजेची असताना आता याकरिता कुणी जमिनी देण्याकरिता तयार नाहीत. शिवाय अशा भागातील ग्रामपंचायतीही याकरिता पुढाकार घेत नसल्याने बहुतांश गावांत जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
स्मशानभूमीला रस्त्यासह इतर सुविधाही पुरविण्याच्या सूचना
स्मशानभूमी विकासाकरिता वर्धा जिल्ह्याला सुमारे सहा कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता, शेड, पाण्याची व्यवस्था, येणाऱ्या व्यक्तींकरिता बसण्याची व्यवस्था आदी कामे करावयाची आहेत. या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०४ गावांत कामे सुरू असल्याची माहिती आहे.
एका स्मशानभूमिकरिता पूर्वी १० लाख रुपये देण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. यात आता बदल करण्यात आला असून हा निधी वाढवून २० लाख रुपये करण्यात आला आहे. या निधीतून प्रत्येक गावातील स्मशानभूमीचे सौदर्यीकरण होणे अपेक्षित आहे.