कोरोनाच्या धास्तीमुळे मोक्षधामात ‘स्मशानशांतता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:27+5:30
अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत.
चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकांची गर्दी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे गर्दी होणाºया कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिक टाळू लागले आहेत. एखाद्याच्या अंत्यविधीसाठी ऐरवी नातेवाइकांसह निकटवर्तीय गर्दी करायचे. सुमारे दीडशे ते दोनशे व्यक्ती अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित रहायचे. परंतु, सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे केवळ मोजकेच व्यक्ती स्मशानभूमीत उपस्थित राहत आहेत. एकूणच स्मशानभूमीत ‘स्मशान’ शांतता राहत असल्याचे बघावयास मिळत आहे.
अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत. कोरोना विषाणूची लागण व संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानुसार जिल्ह्यातील कंपन्या, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी घरूनच काम करू लागले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठीही मदत होऊ लागली आहे. तर बस, रेल्वे, खासगी वाहनांची प्रवासी सेवा बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाणे तसेच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात नागरिकांचे लोंढे येणे बंद आहेत.
प्रत्येक जण हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करून विषाणूपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वी एखादी व्यक्ती दगावल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात गोळा होत होते. परंतु, आता गर्दी होऊ नये म्हणून बोटावर मोजण्या इतक्याच निकटवर्तीयांच्या उपस्थितीत आणि लवकर अंत्यविधी उरकून घेतला जात आहे. तर काही गावांमध्ये दशक्रिया विधी कार्यक्रमही बंद करण्यात आले आहेत. वर्धा शहरात दोन मोठ्या स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीमध्ये दररोज ४ ते ६ अंत्यविधी होत असतात. एखादा राजकीय, प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर २५० ते ३०० पर्यंत जनसमुदाय उपस्थित राहायचा. परंतु, आता केवळ मोजकेच व्यक्तींना अंत्यविधी आटोपून घ्यावा लागत आहे.
वर्ध्यात बाराच्या जवळपास स्मशानभूमी
वर्धा शहरात सर्वधमीर्यांच्या सुमारे १२ स्मशानभूमी आहेत. या विविध स्मशानभूमींमध्ये दररोज धर्मानुसार अंत्यविधी पार पाडले जातात. परंतु, आता कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीही कमी वेळात आटोपून गर्दी टाळावी लागत आहे.
दहा ते बारा दिवसांपूर्वीच अंत्यविधीत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसायची. परंतु, कोरोनाच्या भीतीने आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे आता खूप कमी प्रमाणात नागरिक अंत्यविधीला येताना दिसत आहेत. बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीतच अंत्यविधी होत आहेत.
- मुरलीधर महत्त्वाने, स्मशानभूमी व्यवस्थापक, वर्धा.