पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:39 PM2018-04-11T23:39:09+5:302018-04-11T23:39:09+5:30
नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही. उलट मंगळवारी पाण्याची समस्या घेऊन नगर पंचायतीवर धडकलेल्या महिलांवरच गुन्हे दाखल करण्यात आलेत.
नगर पंचायतीमध्ये आ. कुणावार यांची सत्ता असताना तीन वर्षांपासून पाण्याची समस्या सुटली नाही. पाण्याच्या समस्येकरिता केलेल्या आंदोलकांवर भादंविच्या कलम ३४१, ३४३, १८६ अन्वये तथा मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. मंदा रमेश ठावरे, निर्मला अनिल आलम, वच्छला सदाशिव कुमरे, कुसूम बावणे यांच्यासह २१ महिलांवर गुन्हे दाखल आहे. याबाबत नगर पंचायतचे मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, नगराध्यक्ष शीला सोनारे यासह सर्व नगरसेवकांनी तक्रार केली. आंदोलक महिला दुपारी १२ वाजतापासून रात्री ११ वाजेपर्यंत चिमुकल्यांसह उपाशी पोलीस ठाण्यात ताटकळत होत्या.
पाणी टंचाईसारख्या गंभीर प्रश्नाला महिलांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करून ठिय्या मांडला. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करणे म्हणजे सत्ताधाºयांच्या विरोधात कुणीही आंदोलन करू नये, समस्या मांडू नये, अशाच प्रकारे जनतेची मुसकदाबी करणे होय.
- अशोक शिंदे, माजी आमदार, हिंगणघाट.