पुलगावात दोन कुटुंब आमने-सामने, चालल्या लाठ्या-काठ्या; २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 06:33 PM2022-05-17T18:33:18+5:302022-05-17T18:37:56+5:30
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही कुटुुंबातील सुमारे २८ जणांविरुद्ध तक्रार दाखल करून घेत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
वर्धा : एकमेकांच्या घरावर दगडफेक तसेच घरातील साहित्याची तोडफोड करून लाखोंचे नुकसान करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पुलगाव शहरातील सुदर्शननगर आणि वाल्मिकीनगर परिसरात १६ मे रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही कुटुुंबातील सुमारे २८ जणांविरुद्ध तक्रार दाखल करून घेत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
यातील पहिल्या घटनेत अनिता गणेश ऐतबान (रा. वाल्मीकीनगर) ही घरी असताना राज नाहारकर, सुरज नाहारकर, बादल नाहारकर, जितू नाहारकर, होलीलाल नाहारकर, पप्पू चंडाले, नितीन चंडाले, आकाश चंडाले (सर्व रा. सुदर्शननगर), अक्षय माहुरे, रवी मेश्राम, गौरव नवरंगे, शुभम खडसे, उद्देश सहारे, डंख आणि दोन ते तीन युवक यांनी गैरकायद्याची मंडळी गोळा करून अनिता ऐतबान यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून घरगुती साहित्याची तोडफोड तसेच शिवीगाळ केली. यावेळी घरावर दगडफेकही करण्यात आली. याबाबतची तक्रार देण्यासाठी अनिता पोलीस ठाण्यात जात असताना, मनोज खोडे याच्या घरातील एलसीडी टीव्ही, कुलर लाठीकाठीने तोडून साहित्याची नासधूस केली. तसेच ऑटोच्या काचा फोडून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार त्यांनी दिली.
दुसऱ्या घटनेत बादल राजू नाहरकर हे घरी असताना गणेश रमेश ऐतबान, नरेश रमेश ऐतबान, आयुष गणेश ऐतबान, मनोज खोडे, पियूष खोडे, नितेश सिहोता, अंकुश सिहोता, मुकू जायदे, रजत मतेल, गणेश खोडे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून घरावर दगडफेक केली. तसेच लाठ्याकाठ्यांनी घरातील साहित्याची तोडफोड करून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच राज व जितू यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली. काठीने मारहाण करत जखमी केले. या दोन्ही घटनांची तक्रार हिंगणघाट पोलिसांनी दाखल करून घेतली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.