गुन्ह्याचे प्रमाण २७५ वरून १९८

By admin | Published: June 26, 2017 12:33 AM2017-06-26T00:33:10+5:302017-06-26T00:33:10+5:30

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून समजावून सांगितले जात आहे;

Criminal conviction 275 to 98 | गुन्ह्याचे प्रमाण २७५ वरून १९८

गुन्ह्याचे प्रमाण २७५ वरून १९८

Next

कारवाईचा बडगा : अवैध वृक्षतोडीवर वनविभागाचा वॉच
महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून समजावून सांगितले जात आहे; पण वन्यप्राण्यांसह मनुष्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या वनसंपदेची अवैध कत्तल मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे वास्तव आहे. वन विभागाच्या व्यापक उपायोजनांची यंदा प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याने अवैध वृक्ष कत्तलीला आळा घालण्यात वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. गतवर्षी अवैध वृक्षतोडीच्या २७५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली होती तर यंदा हा आकडा १९८ इतका असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
मध्यंतरीच्या काळात अवैध वृक्षतोडीला जिल्ह्यात उधान आले होते. परिणामी, या प्रकाराला आळा घालण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियोजनबद्द कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून करून घेतली. नागरिकांच्या तक्रारींकडे जिल्ह्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देत झटपट कार्यवाही करण्याला प्राधान्य दिले. सन २०१५-१६ मध्ये अवैध वृक्षतोडीच्या २७५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली होती. त्यावेळी ७५ आरोपींना वन कोठडीत पाठविण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले.
सन २०१६-१७ मध्ये वरिष्ठांनी आखून दिलेल्या प्रभावी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आल्याने अवैध वृक्ष कत्तलीच्या प्रकाराला बऱ्यापैकी आळा बसत या आकड्यात कमालीची घसरण झाली. २०१६-१७ मध्ये १९८ गुन्ह्यांची नोंद घेत २८ आरोपींना वनकोठडीत डांबण्यात यश आले आहे.

तक्रारीकरिता हॅलो फॉरेस्ट
अवैध वृक्षकत्तलीला आळा घालण्यासाठी जानेवारी २०१७ पासून शासनाद्वारे हॅलो फॉरेस्ट कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. यावर प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
दोन वर्षांत १,४१० वृक्षांची अवैध कत्तल
अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यात वनविभागाला बऱ्यापैकी यश आले असले तरी २०१५-१६ मध्ये सागवान तस्करांनी ८२९ तर २०१६-१७ मध्ये ५८१ वृक्षांची कत्तल केली आहे. यात २०१५-१६ मध्ये ४ लाख ९२ हजार ९१० व २०१६-१७ मध्ये ४ लाख ८८ हजार ४६५ रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान केले. दोन वर्षांत अवैध पद्धतीने १ हजार ४१० वृक्ष तोडून एकूण ९ लाख ८१ हजार ३७५ रुपयांचे नुकसान अवैध वृक्षांची कत्तल करणाऱ्यांनी केले असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
८.११ हजारांचा दंड
वन विभागाने ठिकठिकाणी कार्यवाही करून विना परवाना वाहतूक केल्या जाणारा लाकूड साठा मोठ्या प्रमाणात पकडला. २०१५-१६ मध्ये ६२९ नग (३२.००६ घ.मी.) तर २०१६-१७ मध्ये ४५० नग (३३.८६७ घ.मी.) लाकूड पकडून वर्षनिहाय अनुक्रमे ४ लाख १३ हजार ४६२ रुपये आणि ३ लाख ९७ हजार ५५४ रुपये, अशी एकूण ८ लाख ११ हजार १६ रुपयांची वसुली केली.
 

Web Title: Criminal conviction 275 to 98

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.