१२ गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Published: July 27, 2016 12:07 AM2016-07-27T00:07:44+5:302016-07-27T00:07:44+5:30

तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बारा गावांतील १०० हेक्टरवरील शेतजमिनीवर

The crisis of sowing in 12 villages | १२ गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

१२ गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Next

त्वरित मदतीची गरज : अतिवृष्टीच्या सर्वेक्षणासाठी तहसीलदारांना निवेदनातून साकडे
आर्वी : तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बारा गावांतील १०० हेक्टरवरील शेतजमिनीवर पेरलेले बियाणे वाहून गेले. यात पंधरवाडा उलटूनही महसूल विभागाने अतिवृष्टीग्रस्त भागाचा सर्व्हे केला नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सदर शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत तहसीलदार मनोहर चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यात ८ व ९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील लाडेगाव, टाकरखेडा, नांदपूर, देऊरवाडा, निंबोली (शेंडे), कर्माबाद, माटोडा, एकलारा, धनोडी, नांदपूर, अहिरवाडा, राजापूर या गावांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. यात शेतात नुकतीच पेरणी केलेले कपाशी, तूर, सोयाबीन बियाणे या अतिवृष्टीच्या पावसाने वाहून गेले. या सर्व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. १५ दिवसांचा कालावधी लोटूनही नुकसानग्रस्त शेतांचा सर्व्हे करण्यात आला नाही. यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस मनीष उभाड व शेतकऱ्यांनी केली आहे. पहिल्याच पावसात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, बियाणे, खते आणि पेरणीवर झालेला खर्च पूर्णत: बुडाला.
आता पेरणीसाठी दुबार खर्च कसा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. या सर्व बाबींची दखल तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती व महसूल विभागाने घेणे गरजेचे आहे; पण अद्याप सर्वेक्षण न झाल्याने मदत मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॅकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देताना पीक विम्यासाठी दोन टक्के रक्कम कापून घेतली. आता शेतकऱ्यांची पेरणीच व्यर्थ ठरल्याने नुकसानीची रक्कम बँका देणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील पूर्णत: शेती बुडालेल्या भागात त्वरित सर्वेक्षण करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी सुरेंद्र संकलेचा, धनराज इंगळे, सचिन घोडमारे, सुनील जगताप व शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

पिके समाधानकारक; पण पर्जन्यमान अपर्याप्तच
रोहणा : परिसरात १५ जूनपासून पाहिजे तेवढा व पाहिजे तेव्हा पाऊस आल्याने परिसरातील कापूस, सोयाबीन, तूर, मुंग, उडीत आदी पिके समाधानकारक आहेत; पण अर्धा पावसाळा संपत असताना नदी, नाल्यांना पूर येऊन ते प्रवाहित झाले नाहीत. शेतातील अनेक विहिरींची पातळी उन्हाळ्यात होती तेवढीच आहे. काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास भविष्यात ओलित कसे होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रोहणा परिसरातील पिके सध्या समाधानकारक दिसत असली तरी जमिनीतील खोल गेलेली पाण्याची पातळी वर येण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. नदी, नाल्यांना पूर येऊन ते वाहते झाल्याशिवाय जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भोलेश्वरी नदी व नाले अद्याप वाहते झाले नाही. मागील दोन वर्षे झालेल्या कमी पावसाने अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नदी, नाले कोरडे असल्याने त्यावर चालणारे मोटारपंप बंद असल्याचे दिसते.
ओलित बंद झाल्याने शेतात विहीर आहे; पण ओलित नाही, अशी अवस्था आहे. राज्यातील इतर भागात बरसणारा पाऊस रोहणा परिसरावर रूष्ट झाल्याचे जाणवत आहे. पावसातील खंडामुळे पिकाच्या आंतर मशागतीची कामे गतिमान झालीत. यांत्रिकीकरणाच्या युगात बैलजोड्यांची संख्या कमी झाली. बैलजोडी असलेले शेतकरी प्रथम स्वत:च्या शेतात डवरणी करण्यात व्यस्त असल्याने किरायाने जोडी सांगणाऱ्या शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. निंदणासाठी मजूरही गावात कमी असल्याने अन्य गावांतून त्यांना आणावे लागते. मजुरीसह वाहनाचा खर्च सोसावा लागत आहे. यात वाहन मालकांचे फावत आहे. पावसाचे प्रमाण असेच राहून मान्सून परत फिरला तर भविष्यात अडचण निर्माण होणार, ही भीती शेतकऱ्यांना त्रस्त करीत असल्याचे दिसते.(वार्ताहर)

Web Title: The crisis of sowing in 12 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.