शेतात माकडांचा हैदोस
By Admin | Published: September 1, 2016 02:21 AM2016-09-01T02:21:06+5:302016-09-01T02:21:06+5:30
पावसाची वाट पाहत काहीशा चिंतित वातावरणात शेतकरी पोळा सण साजरा करीत आहे.
पिकांचे नुकसान : भरपाई देण्याची मागणी
वर्धा : पावसाची वाट पाहत काहीशा चिंतित वातावरणात शेतकरी पोळा सण साजरा करीत आहे. पावसाचे संकट नैसर्गिक असले तरी माकडांचा शेतात शिरकाव हे मानवनिर्मित आणखी एक नवे संकट शेतकरी वर्गाला त्रस्त करीत आहेत. त्यामुळे पोळ्यासाठी बैलांना सजवून त्यांची आधी सेवा करावी की शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी जावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.
गावांमध्ये धुडगूस घालत असलेल्या माकडांनी सध्या आपला मोर्चा शिवारांकडे वळविला आहे. शेतात तूर, सोयाबीन, कापूस आदी पिके फुलावर येत आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतांमध्ये काकडी, ढेमस, भेंडी आदी भाज्याही पिकावर यायला सुरुवात झाली आहे. हीच संधी साधून माकडांनी शेतांमध्ये धुडगूस घालून पिकांवर ताव मारून नुकसान करण्याचा सपाटा सुरू केला आहे. विशेष म्हणजे सकाळी शेतात कुणी नसल्याची संधी साधून ही माकडे कळपाने शेतात शिरून फुलांवर व कोवळ्या पानांवर ताव मारत आहे. आलेला नवीन बारच तोडल्या जात असल्याने नुकसान होत आहे. वारंवार हाकलूनही माकडे शेतात येतच असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)
शेतकरी वर्गापुढे पेच
पोळा सण असल्याने शेतकरी सध्या बैलांची सजावट आणि त्याची सेवा करण्यात व्यस्त आहे. बैलांची खांद शेकली जात असल्याने शेतकरी पूर्ण वेळ शेतात राहू शकत नाही. त्यातच पाऊस नसल्याने शेतातील कामेही थांबली आहे. नेमका याचाच फायदा घेत माकडांनी शेतात घर करणे सुरू केले आहे. फुलावर आलेली पिके खुडून ते खाण्याचा सपाटाच माकडांनी लावला आहे.
माकडांच्या जीवितासही धोका
शेतात आलेल्या माकडांचा बंदोवस्त करण्यासाठी शेतकरी मिळेत तो मार्ग अवलंबितात. परंतु माकडे पळ काढत असल्याना अनेकदा झाडांवर किंवा रस्ता ओलांडून इतर शेतात जातात. अशावेळी रस्ता ओलांडताना मोठे वाहन आल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. तसेच माकडे ही खोडकर असल्याने ती अनेकदा विजेच्या खांबावार जाऊन बसतात. विजेचा धक्का लागून माकड मरण पावल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. काही शेतकरी माकडांना हाकलून लावण्यासाठी फटाके फोडतात. तसेच छर्ऱ्याची बंदूक वापरूनही माकडांना हाकलून लावले जाते. पण हा उपाय फारसा प्रभावी ठरत नाही. त्यासाठी नेम धरू न माकडांना मारणारा मजूरच नेमावा लागतो. त्यालाही वेगळी मजुरी द्यावी लागते.
महिला मजुरांमध्ये भीतीचे वातावरण
महिलांवर माकड जास्त हल्ले करीत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे महिला मजुरांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. ज्या शेतात माकडांचा हैदोस असतो अशा शेतात शेतमजूर महिला कामास जाण्यास टाळाटाळ करतात. परिणामी कुठला उपाय करावा असा प्रश्न शेतकरी वर्गास पडतो.