वादळी पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:55 AM2017-09-28T00:55:14+5:302017-09-28T00:55:26+5:30
तालुक्यातील रेणकापूर, मुरादपूर, राळेगाव, लाहोरा, वाघोडा, दहेगाव, जाम, वायगाव (ह.) परिसराला मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तुफानी पावसाने झोडपले.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील रेणकापूर, मुरादपूर, राळेगाव, लाहोरा, वाघोडा, दहेगाव, जाम, वायगाव (ह.) परिसराला मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तुफानी पावसाने झोडपले. यामुळे शेतातील कापूस, सोयाबीन पिकाला तडाखा बसला असून दुर्गा उत्सव मंडळांची तारांबळ उडाली. वादळामुळे परिसरातील वीज पुरवठा २४ तास खंडित होता.
मंगळवारला सायंकाळी अचानक वादळासह आलेल्या तुफानी पावसाने शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले. यावर्षी कापसाच्या भरघोस उत्पन्नाची अशा बाळगून बसलेल्या शेतकºयांचा या पावसामुळे फटका बसला आहे. एका तासात २४.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर या मोसमात आतापर्यंत ७३८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १०२९.६ मि.मी. इतका पाऊस झाला होता.
पाऊस आणि वादळामुळे जाम मार्गावरील येथील राधानगरीत टॉवर लाईनची तार जिवंत तार खाली पडली. विद्युत मंडळाच्या पॉवर हाऊसच्या मागे ५० वर्ष जुने असलेले झाड उन्मळून पडले. वाघेडा रोडवरील झाड पडल्याने वीज खांब कोसळला. तसेच दहेगाव रोड, वाघेडा रोड, तहसील कार्यालय परिसरातील अनेक झाड वादळामुळे कोसळले. काही झाडांच्या फांद्या तुटल्या.
काही घरावरील टिनेपत्रे उडाली तर कुठे घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती आहे. या नुकसानीची माहिती मिळताच तहसीलदार दीपक कारंडे यांनी तलाठी, मंडळ अधिकाºयांना नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या पावसाचा फटका समुद्रपूर येथील दुर्गा उत्सव मंडळाला बसला आहे. शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, अशोक वांदीले, महेश झोटींग, रामदास उमरेडकर, शालिक वैद्य आदींनी केले आहे.
उमेदवारांची धावपळ
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र वादळामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने उमेदवारांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे काही उमेदवरांनी हिंगणघाट येथे जात आॅनलाईन अर्ज भरले. यात त्यांची चांगलीच धावपळ झाली. तर काही ठिकाणी पावसामुळे नवरात्रीचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
आर्वी मार्गावरील वाहतूक प्रभावीतच
आकोली - तीन दिवसांपुर्वी आलेल्या वादळी पावसामुळे वर्धा-आर्वी मार्गावरील बारूद कारखान्याजवळ असलेले बाभळीचे झाड पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली आहे. मात्र हे झाड उचलून बाजुला करण्याची तसदी अद्याप बांधकाम विभागाने घेतली नाही. त्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी कायम आहे.
रस्त्याच्या बाजुची अवैध वृक्षतोड असो की, रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार बांधकाम उपविभाग, आर्वी हा नेहमी चर्चेत असतो. तीन दिवसापूर्वी आलेल्या वादळात आर्वी, मासोद, मार्गावरील अनेक मोठमोठी वृक्ष धराशाही झाले आहे. यातील बहुतांश झाडे खरांगणा पोलिसांनी बाजुला करून रस्ता वाहतूक सुरळीत केली. ठाणेदरांनी रस्त्यावर आडवी पडलेली झाडे उचलून बाजुला करण्याबाबत बांधकाम विभाग कार्यालय आर्वी येथे कळविले. पण अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही.
सामान्य वाहन चालकांना यात नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून वाहन कसे काढावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य मार्गावर पडलेल्या बाभळीच्या झाडाने रस्ता व्यापला आहे. कार्यकारी अभियंता यांनी संबंधीत अडचणीची दखल घेवून पडलेले झाड बाजुला करण्याच्या सूचना देण्याची गरज व्यक्त होत आहे.