पावसाच्या दडीमुळे पिकांना धोका
By admin | Published: July 7, 2015 01:45 AM2015-07-07T01:45:18+5:302015-07-07T01:45:18+5:30
मृगाच्या शेवटच्या चरणात तीन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंदीत होऊन...
दुबार पेरणीची भीती : नाचणगावात मुस्लीम बांधवांचे वरुणराजाला साकडे
पुलगाव : मृगाच्या शेवटच्या चरणात तीन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंदीत होऊन ७५ टक्के पेरण्या आटोपल्या. ओलिताची सोय असलेल्या काळ्या मातीत बऱ्याच पेरण्याही साधल्या. गत आठ-दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. यामुळे उष्णतामान वाढले आणि शेतातील पेरणीनंतरचे अंकुर उन्हामुळे करपू लागले. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून पिकांना धोका निर्माण झाला आहे.
पाऊस नसल्याने माळरानावर हिरवे गवत उगवले नाही. परिणामी, गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण होऊन पशु पालकांसमोर चाराटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. गत पंधरवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे कमबॅक व्हावे म्हणून गांधीनगरातील संत नगाजी मंदिरात महिलांनी संपूर्ण आठवडाभर भजन, कीर्तन करून वरुण राजाला साकडे घातले. नाचणगाव येथे मुस्लीम बांधवांनी मस्जिदमध्ये पवित्र रमजानचा नमाज अदा केला.
पाऊस नसल्याने तापमानाचा पारा ३६-३८ वर पोहोचला. यामुळे दिवसा व रात्री अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. परिणामी, पावसामुळे घरात गेलेले कुलर्स पुन्हा बाहेर निघाले. सतत तीन दिवस पाऊस व काही प्रमाणात पावसाच्या सरी यामुळे शेतकऱ्यांनी पदरमोड करून पैसा जुळवित पेरण्या आटोपल्या. बऱ्याच भागात पेरण्या साधल्या. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनचा ४०-३०, असा पेरा केला तर तुरीचा पेरा ३० टक्के झाला. बँका, सावकारांचे उंबरठे झिजवून वेळप्रसंगी गृहस्वामिनीचे सौभाग्याचे लेणे गहाण ठेवून पैसा जमवून बळीराजाने सर्जा-राजाच्या संगतीने पेरण्या साधल्या. सततची नापिकी, घसरलेली आणेवारी खते व बी-बियाण्यांची भाववाढ यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने डोळे वटारल्याने चिंतेने ग्रासले आहे. पेरण्यानंतर शेतात होणाऱ्या रानडुक्कर, मोर, लांडोर, हरिण या श्वापदांचा धुडगूसही दुबार पेरणीचे संकट निर्माण करू शकते. ३ जुलैनंतर पाऊस येणार हा हवामान खात्याचा अंदाजही चुकला असून जुलैचा प्रथम आठवडा कोरडा गेला. शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले असून त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आणखी ३-४ दिवस पाऊस आला नाही तर उन्हाने शेतातील हिरवे अंकुर करपून दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
सेलू - मृग नक्षत्रात उशिरा आलेल्या पावसामुळे शेतशिवारात उगविलेला रानमेवा गत २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुरापस्त झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाला महाग राहत असला तरी शेतकरी, शेतमजुरांना हा रानमेवा दिलासा देतो. पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला असताना शेतात व धुऱ्यांवरील रानमेवाच दिसेनासा झाला आहे.
रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. नंतर मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात तीन दिवस पावसाने हजेरी लावली. तेव्हा शेताच्या बांधावर रानमेवा उगविण्यास सुरूवात झाली; पण आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. उन्हाळ्याप्रमाणे उन्ह तापत असल्याने रानमेव्याची उगवण क्षमता कमी झाली व कोमेजून गेली. केवळ बांधावर तरोटा हा एकमेव रानमेवा दिसत असून आंबाडी, चिवळ, चवळी, जिवतीची फुले, वाघाटे, काटवल आदी रानमेवा मात्र दिसेनासा झाला आहे.
पावसाळा सुरू झाला; पण शेतकरी, शेतमजुरांच्या जेवणात रानमेवा दुरापास्त झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. पावसाची दडी शेतकऱ्यांना हवालदिल करीत असतानाच शेतात भाजीपाला न लावल्याने महाग भाजीपाला घेण्याची वेळ आली आहे.(शहर प्रतिनिधी)
पेरण्या साधल्या; प्रतीक्षा पावसाची
ार्वी - तालुक्यात दमदार पावसाची सुरूवात झाली. दोन दिवसांच्या संततधार पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या. यात तालुक्यात खरीपाची पेरणी अंतिम टप्प्यात असून पावसापूर्वी पेरलेली पऱ्हाटी अंकुरली आहे. सोयाबीन पेरल्यानंतर पावसाची गरज असते; पण गत आठवड्यापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मागील वर्षीचा निसर्गाचा लहरीपणा बघता यंदा शेतकऱ्यांनी दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरूवात केली नाही. गत आठवड्यात तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग केली. यंदा तालुक्यात सोयाबीन कमी व कपाशीचा पेरा अधिक असल्याने ओलिताच्या शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत कपाशी पिकाला पाणी देणे सुरू केले आहे. यात आणखी चार-पाच दिवस पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांच्या संकटात भर पडण्याची चिन्हे आहेत. सध्या पेरण्या आटोपल्याने शेतकऱ्यांना केवळ पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
विरूळ (आकाजी) - गत १५ दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची लागवन केली; पण त्यावर १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत पडला आहे. सतत उन्ह पडत असल्याने बियाण्यांना फुटलेले अंकूर मरणासन्न झाले आहे. कपाशीची दुबार पेरणीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. काही दिवस जर अशीच परिस्थिती राहिली तर दुबार पेरणीशिवाय पर्यायच राहणार नसल्याची भावना शेतकरी बोलून दाखवितात.(वार्ताहर)