३४,४५९ शेतकऱ्यांनी घेतले पीक विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 06:00 AM2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:11+5:30
मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निसर्गाची अवकृपा झाल्यास झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले आहे. सदर शेतकºयांनी नगदी पिकासाठी ५ टक्के तर तृणधान्य आणि कडधान्य पिकांसाठी २ टक्के अशी एकूण ६ कोटी ९५ लाख ७ हजार ४८१ रुपये पीक संरक्षीत रक्कम म्हणून भरली आहे. एकूणच ३९ हजार ५५५.२१२ हेक्टर वरील पिकांना विम्याचे कवच यंदा देण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता. त्याचाच परिणाम यंदा सुरूवातीला पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत दिसून आला. सुरूवातीला शेतकऱ्यांनीही पीक विमा काढण्याच्या विषयाकडे पाठच दाखविण्यात धन्यता मानली होती. परंतु, नंतर पीक विमा काढणाऱ्यांचा आकडा कासवगतीने का होईना पण वाढला. यंदा खरीप हंगामात एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
४२७.८३ हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका
२६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाचा एकूण ४२७.८३ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. १६२.९८ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्केच्या आत तर २६४.८५ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
यंदा भारतीय कृषी विमा कंपनी देणार नुकसान भरपाई
गत वर्षी खरीपात झालेल्या नुकसानीची भरपाई इक्को टोकीयो या विमा कंपनीने पीक विम्याचे कवच घेतलेल्या शेतकऱ्यांना दिली होती. तर यंदाच्या वर्षी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हिच विमा कंपनी पीक विमा काढलेल्या शेतकºयांना देणार आहे.
व्यक्तिगत तक्रार करण्यात आर्वी तालुका पुढे
सोयाबीन, तूर आणि कपाशी उत्पादकांचे परतीच्या पावसामुळे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. काही शेतकºयांनी झालेल्या नुकसानीबाबत थेट कृषी विभागाला तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधींना तक्रारी केल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ८७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यात सर्वाधिक तक्रारी आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. कृषी विभागाने या तक्रारींचे दोन गटात विभागणी केली असून कापणीपूर्व गटात ४६ तर कापणी पश्चात गटात ४१ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी विभागाने केल्याचे सांगण्यात आले.
परतीच्या पावसाने ६१४ शेतकऱ्यांची वाढविली अडचण
यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली. २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस झाला. या पावसामुळे सुमारे ६१४ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीची पाहणी
वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. कृषी विभाग आणि विमा कंपनीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, तालुका कृषी अधिकारी घायतिडक तसेच तहसीलदारांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शेतकरी अशोक नागतोडे, भिमराव भगत, ज्ञानबा ढोले, गणेश राऊत, घनश्याम भूरे यांच्याशी संवाद साधला. शिवाय त्यांच्या शेताची पाहणी केली.