घरकुलाच्या रकमेतून कापले पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:00 AM2017-07-18T01:00:57+5:302017-07-18T01:00:57+5:30
वर्धा तालुक्यातील आष्टा येथील गुलाब महादेव पेंदाम यांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेल्या रकमेतून युनियन बॅँक आॅफ इंडियाने पीक कर्जाची कपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा तालुक्यातील आष्टा येथील गुलाब महादेव पेंदाम यांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेल्या रकमेतून युनियन बॅँक आॅफ इंडियाने पीक कर्जाची कपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत गुलाब पेंदाम या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविताच जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रणी बॅँकेच्या व्यवस्थापकांना याबाबत कडक सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कोणत्याही योजनेच्या रक्कमेतून कर्ज कपात करू नये असे निर्देश दिले आहे.
गुलाब पेंदाम यांचे युनियन बॅँक आॅफ इंडिया शाखा वर्धा येथे खाते आहेत. त्यांना पंतप्रधान शबरी आवास योजनेतून आष्टा ग्रामपंचायतअंतर्गत घरकुल मंजूर झाले. त्याचे बांधकाम त्यांनी सुरू केले. त्यांच्या घरकुलाचे अनुदान बॅँक खात्यावर जमा झाले; परंतु बॅँकेने घरकुलाचे अनुदान खात्यातून परस्पर वळते केले. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही युनियन बॅँक आॅफ इंडियाच्या प्रशासनाने ही बाब केलेली आहे. आपल्या खात्यातील पैसे अचानक गायब झाल्याने पेंदाम यांचे घरकुलाचे कामही अर्धवट पडून आहे. आदिवासी व दारिद्रयरेषेखालील शेतकऱ्यावर बॅँकेने अन्याय केल्यानंतर शेतकऱ्याच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गंभीर दखल घेत सदर शेतकऱ्याची बाजू ऐकूण घेतली व त्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे वळते करा अन्यथा गुन्हा दाखल करू असे निर्देश बॅँक व्यवस्थापनाला दिले. यावेळी शेतकऱ्याच्यासोबत निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे उपस्थित होते.