प्लास्टिक कॅनमुळे माठ विक्रीवर संकट
By admin | Published: April 6, 2017 12:15 AM2017-04-06T00:15:10+5:302017-04-06T00:15:10+5:30
उन्हाळा लागला की पूर्वी घरोघरी माठ किंवा रांजण खरेदी केले जात. मात्र ही जागा आता फ्रीज आणि प्लॉस्टिक कॅनने घेतल्याचे दिसते.
कालौघात मागणीत घट : उत्पादन खर्च वाढला
वर्धा : उन्हाळा लागला की पूर्वी घरोघरी माठ किंवा रांजण खरेदी केले जात. मात्र ही जागा आता फ्रीज आणि प्लॉस्टिक कॅनने घेतल्याचे दिसते. याशिवाय शासकीय कार्यालय, संस्था, शाळा, महाविद्यालय येथेही प्लास्टीक कॅन किंवा फ्रिजर लावण्यात आल्याने माठ आणि रांजणाची मागणी कमालीची घटली आहे.
प्लॉस्टिक कॅनचा थंड पाण्याचा व्यवसाय सुरू झाल्यापासून व्यापारी प्रतिष्ठाण, शासकीय व निअशासकीय कार्यालयात बाराही महिने थंड पाण्याचा पुरवठा केल्या जातो. यात शाळांचाही समावेश आहे. सहजतेने पिण्याचे थंड पाणी उपलब्ध होत असल्याने माठ आणि रांजण मागे पडले आहे. आजकाल प्रत्येक समारंभात प्लॉस्टिक कॅन नजरेस पडतात. याचा थेट परिणाम माठ विक्रीवर झाला आहे. काही विक्रेत्यांकडे तर मागील वर्षीचा माल पडून आहे. मागणी नसल्याने विक्रेत्यांना याचा फटका बसला असून त्यांच्या व्यवसायावर संकट ओढवले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न
सेवाग्राम - होळी झाल्यावर उन्हाचे चटके जाणवायला लागतात. यंदा तर मार्च महिन्यातच रात्रीला थंडी व दिवसाला उन्ह अशा स्थितीचा नागरिकांना सामना करावा लागला. उष्णतामान वाढल्यावर शीतपेय, कुलर, थंड पाणी याची गरज पडते. पूर्वी उन्हाळ्याला प्रारंभ होताच थंड पाण्याची व्यवस्था म्हणून घरोघरी नवीन माठ खरेदी केला जात. कालौघात ही प्रथा मागे पडल्याचे दिसते. पूर्वीच्या तुलनेत माठाचे विक्री कमी होत असल्याचे कुंभार कारागीर सांगतात.
नैसर्गिक व आरोग्यवर्धक थंडजल देणारे माठ स्थानिक बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. या माठाची किंमत ८० ते १५० रुपयांपर्यंत आहे. तर रांजणाची किंमत ३०० रूपयांपासून ७०० पर्यंत आहे, अशी माहिती येथील विज्रेता इंदू पाठक यांनी दिली. या व्यवसायावर प्लास्टीक कॅनचे संकट निर्माण झाल्याने मागणी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
सेवाग्राम मेडिकल चौकात गत २५ वर्षांपासून माठ विक्रीची दुकाने लागतात. याशिवाय मातीपासून निर्मित मूर्त्या, माठ, सुगडे, झाकण्या, पणत्या आदी विक्रीला ठेवतात. चानकी (कोपरा) येथील काही कुटुंब या व्यवसायात आहे. मात्र बदलत्या काळात या व्यवसायावर संकट निर्माण झाले. माठ व रांजनाची मागणी घटल्याचे चित्र असल्याने दिवसभर दुकानाकडे ग्राहक फिरकत नसल्याचे वास्तव विक्रेत्यांनी कथन केले. भविष्यात पुजेकरिता लागणारे माठच विकावे लागेल काय अशी शंका व्यक्त करण्यात येते.
नव्या व्यवसायामुळे ग्रामीण भागात माठविक्रीचा व्यवसाय धोक्यात आला आहे. आरोग्यवर्धक असून थंडपाणी देणारे माठ आता हळूहळू हद्दपार होताना दिसून येत आहे. उन्हाळ्यात शाळा, संस्थेमध्ये रांजनाची मागणी असायची. मात्र यातही घट झाल्याचे दिसते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी माठाची निर्मिती केली जाते. तरीही तुमसर, मध्यप्रदेशातून विविध आकारातील आकर्षक माठ विक्रीकरिता बाजारपेठेत आले आहे. मात्र माठ निर्मिती त्याची विक्री करणाऱ्या कुटुंबापुढे आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्लास्टिक कँनच्या वाढत्या व्यवसायामुळे हा पारंपरिक व्यवसाय माघारत असल्याचे दिसून येते.