९३,८१५ हेक्टरवर होणार पिकांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 05:00 AM2020-10-07T05:00:00+5:302020-10-07T05:00:25+5:30
कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शिवाय यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसाचा चांगला फटकाच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना बसला. असे असले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीत बऱ्यापैकी ओलावा कायम आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्वच जलाशय फुल्ल झाले आहेत. त्यामुळे यंदा रबीचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता असून रबी हंगामात ९३ हजार ८१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शिवाय यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. खरीपात झालेल्या नुकसानाची भरपाई काढण्यासाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रबी हंगामासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे यंदा रबीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी रबी हंगामात ६६ हजार ८८९ हेक्टरवर शेतकºयांनी गहू, चणा आदी पिकांची लागवड केली होती. तर यंदा जिल्ह्यात ९३ हजार ८१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.
४७,८६२ क्विंटल बियाणे लागणार
यंदा ९३,८१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होणार असल्याचा कयास कृषी विभागाचा असून त्याकरिता किती बियाणे लागेल याचा अंदाज काढण्यात आला आहे. रबी हंगामात एकूण ४७ हजार ८६२ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार असून आतापर्यंत अडीच हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात चणा बियाण्याचा समावेश आहे. तर येत्या काही दिवसांत गव्हासह इतर विविध बियाणे प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.
यंदा खतकोंडी होणार नाहीच
सध्यास्थितीत जिल्ह्यात २५ हजार मेट्रीक टन खत आहे. शिवाय रबी हंगामासाठी वेळीच खताचा साठा जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे यंदा रबी हंगामात कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात खतकोंडी होणार नसल्याचे कृषी बोलले जात आहे.
रबी हंगामात लागवड क्षेत्र वाढेल असा अंदाज असला तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण खत, बियाणे कमी पडू नये यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. तसेच विशेष प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे सध्या मुबलक प्रमाणात बियाणे आणि खत जिल्ह्यात आहे.
- अभय चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी, वर्धा.