१५ मे च्या ‘डेडलाईन’ने शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:51 PM2018-05-13T23:51:48+5:302018-05-13T23:51:48+5:30
नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना अखेरची मुदत १५ मे दिली आहे. ही ‘डेडलाईन’ लक्षात घेत शुक्रवारी व शनिवारी नाफेडला तूर देण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना अखेरची मुदत १५ मे दिली आहे. ही ‘डेडलाईन’ लक्षात घेत शुक्रवारी व शनिवारी नाफेडला तूर देण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
तूर खरेदीला दोनच दिवस राहिले. या दोन दिवसांत शेतकऱ्यांची संपूर्ण तूर नाफेड खरेदी करू शकत नाही. यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी होत आहे. शनिवारी बाजार समितीत नाफेडला विक्रमी आवक झाली. एकाच दिवशी १२८ शेतकऱ्यांची ११३३ क्विंटल तूर नाफेडने स्वीकारली. यात आज रविवार असताना उर्वरित शेतकऱ्यांच्या तुरीचा काटा सुरू होता. आणखी नोंदणी केलेल्या ११० शेतकऱ्यांची तूर नाफेडने खरेदी करणे शिल्लक आहे. नाफेडने शेतकऱ्यांची तूर खरेदीची अखेरची मुदत १५ मे ठेवल्याने दोन दिवसांपासून नाफेडला तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे नंबर येऊनही मालाचा काटा होण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी शेतकऱ्यांनी आर्वी बाजार समितीत तूर आणली. एकाच दिवशी ११३३ क्विंटल तुरीची आवक झाली. नाफेडकडे गोदाम उपलब्ध नसल्याने बाजार समितीच्या यार्डवर आलेल्या ६ हजार कट्टे तुरी बाजार समितीच्या गोदामात पडून आहे. हा माल नाफेडच्या गोदामात जात नाही, तोपर्यंत चुकाऱ्यांना गती येणार नाही, असे समितीने सांगितले. समितीकडे ११० शेतकऱ्यांच्या तुरीची नोंद असून ती १४ व १५ या दोन दिवसांत पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची तूर आवक सुरू आहे. एकाच दिवशी १२८ शेतकºयांची तूर स्वीकारली. उर्वरित नोंद केलेल्या शेतकऱ्यांची तूर स्वीकारली जाईल. यासाठी नाफेडने माल ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृउबास, आर्वी.