राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने गाठला कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:10 AM2018-11-26T00:10:13+5:302018-11-26T00:12:06+5:30
देश-विदेशात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या स्थानिक राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने सध्या कळस गाठल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन पदाधिकाºयांची निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देश-विदेशात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या स्थानिक राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने सध्या कळस गाठल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन पदाधिकाºयांची निवड झाली. परंतु, काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी गैरकायद्याची मंडळी गोळा करून थेट राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या आवारात येत तेथील दोन कार्यालयाचे कुलूप तोडून परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम केले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या नवीन कार्यकारणीचा वाद धर्मदाय आयुक्त कार्यालयासह सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावर न्यायालयाकडून सूचना प्राप्त होताच आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात अविरोध निवडून आलेले नवीन पदाधिकारी वगळता उर्वरित पदाधिकाºयांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी शांततेत पार पडलेल्या निवडणुकीनंतर श्रेयासह खुर्चीचा वाद संपूष्टात आल्याचे बोलले जात होते. परंतु, निवडणूक होऊन केवळ एक महिन्याचाच कालावधी लोटता पुन्हा श्रेयवाद शनिवारी सायंकाळी उफाळून आला. जुन्या पदाधिकाऱ्यांसह सुमारे २५ ते ३० जणांनी शनिवारी सायंकाळी थेट राष्ट्रभाषा प्रचार समितीचे आवार गाठून प्रधानमंत्री कार्यालय व आनंदकुटी अध्यक्ष निवासाचे कुलूप तोडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकरणी अनंतराम सुरजप्रसाद त्रिपाठी (८५) यांच्या तक्रारीवरून सुर्यवंशी, चौधरी, जईता सेन बराट, नरेश शिखरे, गणेश धमाणे, ढोणे व इतर २० जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ४५४ व १३५ बी.पी. अॅक्ट. नुसार गुन्हा दाखल करून संजय गुजर रा. सावंगी (मेघे), नरेश शिखरे व गणेशसिंग धमाणे दोन्ही रा. राष्ट्रभाषा प्रचार समिती यांना अटक केली आहे.
परिसरात दहशत
सुमारे २५ ते ३० जणांनी संगणमत करून एम. एच. ३२ ई. के. ५०१७ क्रमांकाच्या दुचाकीसह इतर वाहनांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती गाठून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करण्यात सुरूवात केली. इतकेच नव्हे तर त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही खरेखोटी सुनावल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती.