अवैध दारूविक्रीला लगाम; पण गांजा विक्री अद्याप बेलगाम?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 09:15 PM2022-11-20T21:15:05+5:302022-11-20T21:17:11+5:30
गांजा ओढणाऱ्यांत अल्पवयीन मुलांचाही समावेश राहत असल्याने उधाण आलेली गांजा विक्री वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी देणारा ठरत आहे. परिणामी, राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेला वर्धा हा व्यसनमुक्त तसेच गुन्हेगारीमुक्त जिल्हा व्हावा, यासाठी नवीन पोलिस अधीक्षकांनी विशेष रणनीती आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याची गरज सुजाण नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात अवैध व्यवसायांना उधाण आले होते. तर नवीन पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी वर्धा जिल्ह्याची सेनापती म्हणून जबाबदारी स्विकारल्यावर अवघ्या काही दिवसांतच उधाण आलेल्या दारूविक्रीला बऱ्यापैकी ब्रेक लागला आहे. असे असले तरी जिल्ह्याबाहेरून मोठ्या प्रमाणात आयात होत अवघ्या १०० ते २०० रुपयाला चिल्लर विक्री होणाऱ्या गांजा विक्रीला पाहिजे तसा अजूनही ब्रेक लागलेला नाही. परिणामी, जिल्ह्यातील तरुण पिढी व्यसनाधिनतेच्या दरीत जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गांजा ओढणाऱ्यांत अल्पवयीन मुलांचाही समावेश राहत असल्याने उधाण आलेली गांजा विक्री वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी देणारा ठरत आहे. परिणामी, राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेला वर्धा हा व्यसनमुक्त तसेच गुन्हेगारीमुक्त जिल्हा व्हावा, यासाठी नवीन पोलिस अधीक्षकांनी विशेष रणनीती आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याची गरज सुजाण नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या कलमान्वये केली जातेय फौजदारी कारवाई
- गांजा विक्री तसेच तस्करी करणाऱ्यावर एनडीपीएसच्या कलम २० प्रकरणे फौजदारी कारवाई केली जाते. तर गांजा सेवन करणाऱ्यावर कलम २७ अन्वये कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
नव्या एसपींनी तयार केले विशेष पथक
- पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी वर्धा येथे रुजू होताच अवैध व्यवसाय व व्यावसायिकांविरुद्ध धडक कारवाई सत्रच सुरू केले आहे. शिवाय गांजा विक्री तसेच गांजा ओढणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी पोलिस अधिकारी बालाजी लालपालवाले यांच्या नेतृत्वात एकूण पाच मनुष्यबळाचा समावेश असलेले विशेष पथक तयार केले आहे. माहिती मिळताच हे पथक ॲक्शन मोडवर येत धडक कारवाई करीत असल्याचे सांगण्यात आले.
जीर्ण इमारती अन् मोकळ्या जागांवर भरते जत्रा
- जीर्ण इमारती अन् मोकळ्या जागांवर नेहमीच गांजा ओढणाऱ्यांची जत्रा भरते. मिळेल तेथून अवघ्या १०० ते २०० रुपयांत गांजाची पुडी खरेदी केल्यावर गांजा ओढणारे गांजाच्या सेवनासाठी सुरक्षित स्थान म्हणून जीर्ण इमारती तसेच मोकळ्या जागांना पसंती दर्शवितात. एका चिलममध्ये तब्बल पाच गांजा शौकीन आपले व्यसन पूर्ण करतात. शिवाय हेच गांजाची झिंग असलेले तरुण बहुधा मुख्य मार्गांवरून सुसाट वाहने पळवितात. त्यामुळे इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने पोलिस विभागाच्या पथकाने जीर्ण इमारती व मोकळ्या जागांवर धडक सत्र सुरू करण्याची मागणी आहे.
दहा महिन्यांत केवळ आठ विक्रेत्यांवर कारवाई
- मागील दहा महिन्यांत पोलिस विभागाकडून आठ ठिकाणी धडक कारवाई करून गांजा विक्रेत्यांसह तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान एकूण दहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २८४ किलो गांजा व इतर साहित्य असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याबाबतची नोंद पोलिस विभागाने घेतली आहे.