वैविध्यपूर्ण दिव्यांनी ग्राहकांना घातली भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:29 PM2017-10-16T23:29:36+5:302017-10-16T23:29:55+5:30
दिवाळी हा सण प्रकाशाचा अंधारावर दीपतेजाने मात करण्याचा. त्यामुळे दिवे, पणत्या याची खरेदी प्रामुख्याने केली जाते.
श्रेया केने।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळी हा सण प्रकाशाचा अंधारावर दीपतेजाने मात करण्याचा. त्यामुळे दिवे, पणत्या याची खरेदी प्रामुख्याने केली जाते. हीच बाब हेरून यंदा बाजारात विविध आकारातील वैविध्यपूर्ण दिवे विक्रीकरिता आले आहे. रंगबेरंगी आकाशकंदिलांची अनेक दुकाने सजली आहे. दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने स्थानिक बाजारपेठेत खरेदीकरिता लगबग दिसून आली.
विविध आकारातील पणत्या रंगरंगोटी करून अधिक आकर्षक करण्यात आल्या आहेत. मातीच्या पणत्या यात कुठेतरी मागे पडल्याचे दिसून येते. पणत्यांचे आकारमान आणि स्वरूप बदलून त्या नवीन रूपात ग्राहकांना विकण्यात येत आहे. केवळ पणत्यांपर्यंत हे नाविन्य मर्यादित न राहता दिव्यांचे झुंबर सुद्धा विक्रीला आहे.
चार ते पाच पणत्या एकत्रित करून घराचा आकार किंवा देवी देवतांच्या प्रतिमांचा वापर करून पणती स्टँड तयार केले आहे. याची साधारण किंमत १०० ते १५० रुपये आहे. या पणती स्टँडचा वापर घराचा कोपरा सुशोभित करण्यासाठी अथवा रांगोळीत ठेवण्यासाठी करतात. सध्या या स्टँडला विशेष मागणी असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.