सायबर ठाण्याच्या कार्याची घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:54 PM2019-05-08T23:54:42+5:302019-05-08T23:55:09+5:30
दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात ४० सायबर लॅब स्थापन केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धेतही सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात ४० सायबर लॅब स्थापन केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धेतही सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. याच सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने रामनगर व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा छडा लावत बनावटी कॉल सेंटर उघडकीस आणण्याच्या उल्लेखनिय कार्याची मुंबई दरबारी दखल घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात वर्धा सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) ब्रिजेश सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
१५ आॅगस्ट २०१६ ला स्थापन करण्यात आलेल्या सायबर लॅबला त्यानंतर पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालणे, जनतेमध्ये सायबर गुन्ह्यांसंबधाने जनजागृती करणे, दाखल गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून सायबर गुन्ह्यांचे प्रकटीकरण करणे हा या पोलीस ठाण्याचा उद्देश आहे. वर्धा सायबर पोलीस ठाण्यातर्फे क्रेडीट कार्ड फ्रॉड, मोबाईल टॉवरच्या नावाखाली झालेली फसवणूक, भाग्यवान विजेते सांगून केले जाणारे गुन्हे, बँक खात्यातून परस्पर उडविली जाणारी रक्कम, अशी विविध गुन्हे उघडकीस आणली आहे. याच कार्याची दखल पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन वर्धेच्या पोलीस कर्मचाºयांना गौरविले आहे.
मागील तीन वर्षांमध्ये राज्यातील सायबर पो.स्टे. ने केलेल्या उल्लेखनिय कामगीरी, गुन्हे प्रकटीकरण, जनजागृती, राबवीलेले अभीनव उपक्रम या बाबत लेखाजोखा सादर करण्याच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर यांनी ४ मे रोजी मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत वर्धा सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या रामनगर व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकटीकरणातील मदतीची यावेळी वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली. शिवाय विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) ब्रिजेश सिंग यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले आहे.