मातृभाषेच्या संवर्धनाकरिता सायकलने देशभ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:18 PM2019-08-01T13:18:33+5:302019-08-01T13:21:03+5:30
मराठी या मातृभाषेच्या संवर्धनाकरिता विविधांगी प्रयत्न सुरू असतानाच गंधार कुलकर्णी या ध्येयवेड्या युवकाने मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलने देशभ्रमंती सुरू केली आहे.
दिलीपा चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मराठी या मातृभाषेच्या संवर्धनाकरिता विविधांगी प्रयत्न सुरू असतानाच एका ध्येयवेड्या युवकाने मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलने देशभ्रमंती सुरू केली आहे. गंधार कुलकर्णी असे या युवकाचे नाव असून भ्रमंतीदरम्यान त्याने सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली आहे. येथे दोन दिवस ते मुक्कामी राहून गांधीजींच्या विचाराची माहिती जाणून घेणार आहे.
गंधार कुलकर्णी या २५ वर्षीय युवकाने १ जुलै २०१८ रोजी डोंबिवली येथून या सायकल यात्रेला सुरुवात केली. त्यांनी पुण्यातून संस्कृतमध्ये एम.ए. चे शिक्षण घेतले आहे. तो डोंबिवलीतील ज्ञानप्रबोधिनीचा कार्यकर्ता असून मातृभाषेला बळकटी देण्याकरिता आणि व्यवहारातील महत्त्व वाढविण्याकरिता सायकलने देशभ्रमंती सुरू केली आहे. मुंबईतील डोंबिवली येथून प्रवासाला सुरूवात करून मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरातपर्यंतची यात्रा करून परत मुंबई, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, बंगाल, झारखंड, आसाम, अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश असा प्रवास करून महाराष्ट्रातील नागपूर आणि मंगळवारी वर्ध्यानजीकच्या सेवाग्राम आश्रमापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आश्रमातून प्रेरणा घेऊन पुढील प्रवास उद्यापासून सुरू होणार आहे. येत्या १४ आॅगस्टला मुंबई येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. गंधार कुलकर्णी हे मातृभाषेच्या सवंर्धनाकरिता यात्रेच्या समारोपापर्यंत २४ राज्यातून १८ हजार ९ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत.
बापू आणि विनोबांच्या कर्मभूमीचे घेतले दर्शन
जगाला शांताचा संदेश देणारे महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे या दोन्ही महापुरुषांची ही कर्मभूमी असल्याने गंधार कुलक र्णी यांनी विनोबांजींच्या पवनार आश्रम आणि सेवाग्रामच्या बापू कुटीला भेट दिली. सेवाग्रम आश्रम परिसरातील आश्रमातील आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास, बापू दप्तर आदी वास्तूंची पाहणी करून बापूंचे विचार जाणून घेतले.
मातृभाषेला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक आपला विकास आपल्याच भाषेतून अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे सध्यातरी नोकरीचा विचार न करता आपल्या मातृभाषेला प्रोत्साहन मिळावे याकरिता देशभ्रमंती सुरू केली असून ठिकठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, कट्टा आणि भाषा तज्ज्ञांची भेट घेऊन चर्चा करीत आहे. प्रवासादरम्यान सर्वांनीच चागले सहकार्य केले असून अतिथी देवो भवचाच अनुभव आला आहे.
- गंधार कुलकर्णी, यात्रेकरु.