काकडदरा गाव समस्यांच्या चक्रव्यूहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:39 AM2018-02-27T00:39:56+5:302018-02-27T00:39:56+5:30

तालुक्याच्या २७७ लोकसंख्या असलेल्या व १०० टक्के आदिवासी बांधव राहणाºया काकडदरा हे पाणीदार गाव दोन महिन्यांपासून पाण्याविना तहानलेले आहे.

In the cyclone of Kakadara village problem | काकडदरा गाव समस्यांच्या चक्रव्यूहात

काकडदरा गाव समस्यांच्या चक्रव्यूहात

Next
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून पाणीटंचाई : पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, मूलभूत सुविधांचा अभाव

आॅनलाईन लोकमत
आर्वी : तालुक्याच्या २७७ लोकसंख्या असलेल्या व १०० टक्के आदिवासी बांधव राहणाºया काकडदरा हे पाणीदार गाव दोन महिन्यांपासून पाण्याविना तहानलेले आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रस्तूत प्रतिनिधीने गावाला भेट देत केलेल्या पाहणीत हे जळजळीत वास्तव पूढे आले आहे. अख्ख्या महाराष्ट्रात पाणीदार गाव म्हणून ओळख असलेल्या काकडदरा येथील ग्रामस्थ मुलभूत समस्यांच्या चक्रव्यूहात अडकल्याचे दिसून येते.
मागील वर्षी ५० लाखांचा पाणी फाऊंडेशनचा पहिला पुरस्कार पटकविणाºया काकडदरा गावात पाणीपुरवठा करणारी एकमेव विहिर आहे. ही विहीर गावापासून दीड किमी अंतरावर आहे. हे दीड किमी अंतर पायपीट करीत गावातील महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन आपल्या कुटुंबाची तहान भागवित असल्याचे दिसून आले. पाणी फाऊंडेशनने काकडदरा या गावात श्रमदानाने गाव पाणीदार केले. यात या गावाला ५० लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला. या पुरस्कारातील गावातील आदिवासी बांधवांचा विकास होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होता; पण हे पाणीदार गाव तहानलेले असल्याचे दिसून आले. मुलभूत विकासापासूनही गाव दूरच असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
काकडदरा या गावात येण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. गावात शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. गावात एकच अंगणवाडी आहे. या अंगणवाडीत शून्य ते सहा वर्षांचे ३० चिमुकले शिकतात. या अंगणवाडीची भिंत जीर्णावस्थेत असून तडे गेले आहेत. पावसाळ्यात अंगणवाडीच्या खोलीत टोंगळाभर पाणी साचून असते. जीव मुठीत घेऊन चिमुकले शिक्षण घेत आहे. एक महिन्यापूर्वी शिक्षक बदलून गेला; पण अद्याप गावात नवीन शिक्षक आला नाही. अंगणवाडीची इमारत बसण्यायोग्य नसल्याचे गावात आलेल्या सर्व अधिकाºयांनी निक्षून सांगितले; पण अंगणवाडीसाठी दुसरी इमारत नसल्याने चिमुकले जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे. या अंगणवाडीची समस्या गावाला भेट देणाºया सर्व शासकीय अधिकाºयांना सांगितली; पण कुणीही ही गंभीर समस्या मार्गी लावली नसल्याची प्रतिक्रीया अंगणवाडी सेविका मीरा कोमटी यांनी व्यक्त केली.
१०० टक्के आदिवासीबहूल गाव असल्याने शासनाच्या सर्व योजनांचा लाभ ग्रामस्थांना होईल, असे अपेक्षित होते; पण या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. गावातील ३७७ गावकºयांपैकी केवळ १३ ग्रामस्थांची नावे बीपीएल यादीत आहेत. गावात शेती तथा दुसºयाच्या शेतीवर काम करून पोट भरणे, हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. गावात शासकीय योजनांची प्रतीक्षा कायम आहे. घरकूल योजनेपासूनही ग्रामस्थ वंचित आहेत. या गावाहून तालुकास्थळ १५ किमी अंतरावर तर गौरखेडा हे पाच किमी अंतरावर आहे. गावाला पक्क्या रस्त्याने जोडण्याची मागणी अद्यापही प्रलंबित आहे.
गावकºयांच्या सहकार्याने गावात श्रमदानाने ९० दगडी बाध बांधले. ज्या रस्त्यावरून साधे चालताही येत नाही, त्या रस्त्याने ग्रामस्थ पायपीट करतात. सालदरा या गावाच्या बाजारासाठी चार किमी अंतर पायी जावे लागते. गावात एसटी येत नाही. खासगी वाहनाने ये-जा करावी लागते. गावातील घरांसाठी बांबूचे कुंपण लावण्यासाठी बांबू आणले गेले; पण तेही निकृष्ट दर्जाचे असल्याने ग्रामस्थांनी कुंपण करण्यास नकार दिला. लोकवर्गणीतून गावात विहीर बांधली. पहिली ते पाचवी जि.प. शाळा आहे. या शाळा परिसरात पाण्याची टाकी असून त्यातून गळती होत असल्याने तेच गढूळ पाणी मुलांना प्यावे लागते. यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
२४ फेब्रुवारी रोजी काकडदरा गावाला भेट देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले होते. यासाठी ग्रामस्थ काम सोडून घरी राहिले; पण ते आलेच नाही. शासकीय अधिकाºयांनी गावात योजनांचा पाऊस पाडला; पण प्रत्यक्ष योजना पोहोचल्याच नाही. आम्हाला पुरस्कार नको, सुविधा पुरवा, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य पांडुरंग खराबे यांनी केली आहे.
प्रशिक्षणार्थ्यांची तहान भागविण्यासाठी ‘कॅन’चा आधार
काकडदरा या गावाचा अभ्यास करण्यासाठी पाणी फाऊंडेशनद्वारे प्रशिक्षण वर्ग राबविले जात आहे. यासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून प्रतिनिधी या गावात आलेले आहेत. या प्रशिक्षणार्थ्यांना बाहेरगावाहून पाण्याच्या कॅन बोलवून तहान भागवावी लागत आहे, हे विशेष. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आलेले पाणीदार काकडदरा हे गाव मुलभूत सुविधांपासून कोसोदूर आहे. गाव पाणीदार झाले; पण ग्रामस्थ तहानलेलेच असून हे विदारक वास्तव स्वीकारत कार्यवाही गरजेची आहे.

पाणीपुरवठ्यासाठी गावात एकमेव विहीर
गावात पाणी पुरवठ्याची एकमेव विहीर आहे. तीन दीड किमी अंतरावर आहे. गावाला याच विहिरीवरून पाणीपुरवठा होतो; पण पाणीपुरवठ्याची पाईपलाईन जागोजागी फुटल्याने गावात नळाला पाणीच येत नाही. पाणीदार झालेले गाव दोन महिन्यांपासून तहानलेले आहे. परिणामी, गावातील महिलांना गावाबाहेर असलेल्या जंगल परिसरातील दीड किमी अंतरावरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. या गावाला भेटी देणाऱ्यां अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन दुरूस्त करण्याचे केवळ आश्वासन दिले; पण ही मुलभूत समस्या अद्याप कायम आहे. या गावातील समस्येकडे कुण्याही अधिकाºयाने लक्ष दिले नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गावातील अंगणवाडीची इमारत पडक्या अवस्थेत आहे. ही इमारत बसण्यायोग्य नाही, असे सर्व अधिकाऱ्यांनी गावात येऊन सांगितले; पण समस्या सोडविली नाही. गावात दोन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. पाईपलाईन फुटलेली आहे.
- मीरा कोमटी, अंगणवाडी सेविका, काकडदरा.

गावात कुठल्याही मुलभूत सुविधा नाहीत. घरकूल योजनेची प्रतीक्षा कायम आहे. रस्ता नाही. गावात पाणीपुरवठा योग्य होत नाही. गावकरी शासकीय योजनांपासून वंचित आहेत.
- पांडुरंग खराबे, ग्रा.पं. सदस्य, काकडदरा.

महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनचे पहिल्या पुरस्काराचे मानकरी काकडदरा गावात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब काही दिवसांपासून सातत्याने भेट दिल्यानंतर दिसून आली. काकडदरावासीयांच्या मुलभूत गरजा पूर्ण झाल्या नाही. शासन सुविधा पुरविण्यासाठी गंभीर नाही. पुरस्काराच्या ५० लाखांचे नियोजन कुठे करणार आहे, हे कळायला मार्ग नाही. मुलभूत समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ग्रामस्थांच्या पाठीशी आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा अधिक तीव्र करू.
- दिलीप पोटफोडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख, युवा स्वाभिमान पक्ष, आर्वी.

Web Title: In the cyclone of Kakadara village problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.