डोंगरगाव येथे सिलिंडरचा स्फोट; दोन गंभीर
By admin | Published: April 1, 2015 01:49 AM2015-04-01T01:49:58+5:302015-04-01T01:49:58+5:30
चहा बनविण्याकरिता गॅस सुरू केला असता रेग्युलेटरने पेट घेतला. यात सिलिंडरचा स्फोट झाला.
समुद्रपूर : चहा बनविण्याकरिता गॅस सुरू केला असता रेग्युलेटरने पेट घेतला. यात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात दोन युवक गंभीर जखमी झाले तर दोन किरकोळ जखमी झाले. सदर घटना तालुक्यातील डोंगरगाव येथे सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. सुनील साठोणे, किशोर नोकरकर अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
डोंगरगाव येथील लक्ष्मीबाई गणपत गोटेफोडे या चहा बनविण्याकरिता गेल्या असता त्यांना बर्णरमधून आग निघताना दिसली. यात पाहता पाहता ही आग रेग्युलेटरपर्यंत पोहोचली. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा विलास गोटेफोडे व त्याचे मित्र धावत आले. आग पाहून घरातील साहित्य बाहेर काढणे सुरू केले. त्याचवेळी सिलिंडरचा स्फोट झाला. यात सुनील साठोणे व किशोर नौकरकर गंभीर जखमी झाले तर राहुल लोहकरे, विलास गोटेफोडे किरकोळ जखमी झाले.
या आगीत घरातील रोख चार हजार रुपये, महत्त्वपूर्ण कागदपत्र, बँकेचे पासबुक व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच जमादार अनिल राऊत व रवी वानखेडे यांनी पंचनामा केला. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)