रुख्मिणीनगरात सिलिंडरचा स्फोट; दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:19 AM2019-02-28T00:19:10+5:302019-02-28T00:19:39+5:30
भागातील रुख्मिणीनगरातील गुंडतवार यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या जयस्वाल यांच्या घरात अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिंदी (मेघे) भागातील रुख्मिणीनगरातील गुंडतवार यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या जयस्वाल यांच्या घरात अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली असून अक्षय गुंडावार (२६) व तेजस पोहाणे (२०) असे जखमींची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, रुख्मिणीनगर येथील अमर जयस्वाल यांच्या घरी आग लागल्याची माहिती मिळताच अक्षय गुंडावार व तेजस पोहाणे हे अमर जयस्वाल यांच्या पत्नीला मदत करण्यासाठी गेले. दरम्यान अमर जयस्वाल यांच्या पत्नी व मुलगा हे दोघे घराबाहेर पडले. याचवेळी आगीने घरातील साहित्याला आपल्या कवेत घेत रौद्ररुप धारण केले. दरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात अक्षय व तेजस गंभीर जखमी झाले. जोरदार आवाज झाल्याने दुपारच्यावेळी विश्राती घेत असलेले परिसरातील नागरिक घराबाहेर आले. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत घटनेची माहिती न.प.च्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाच्या भीमराव येडमे, सेवक लोहवे व रामभाऊ प्रधान यांनी अग्निशमनबंबासह घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर चंदेल, दिनेश चव्हाण, कैलास पेटकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली असून ही आग घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस गळतीने लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत भाडेकरू जयस्वाल व घरमालक गुंडावार यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
अन् भीतीपोटी घराघरातील गॅस सिलिंडर निघाले बाहेर
जोरदार आवाज झाल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरातील सिलिंडर घराबाहेर काढले होते. इतकेच नव्हे तर घटनेच्यावेळी जयस्वाल यांच्या घरात एक आणखी भरलेले सिलिंडर होते. परंतु, आगेवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.