Vidhan Sabha Election 2019; वर्ध्यात विद्यमान भाजप आमदारासह दादाराव केचेंना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 11:24 AM2019-10-02T11:24:35+5:302019-10-02T11:26:40+5:30
वर्धा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. पंकज राजेश भोयर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिंगणघाट मतदार संघातून समीर कुणावार यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. वर्धा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. पंकज राजेश भोयर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिंगणघाट मतदार संघातून समीर कुणावार यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
ज्या आर्वी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून माजी आमदार दादाराव केचे व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर दिवे यांच्यात रस्सीखेच सुरू होती, त्यालाही आज विराम मिळाला आहे. या मतदारसंघातून दादाराव केचे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर देवळी मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. येथून शिवसेनेने समीर सुरेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भाजप-सेना युतीचे वर्धा जिल्ह्यातील सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत डॉ. पंकज भोयर यांनी या मतदारसंघातून ८ हजांरावर अधिक मतांनी विजय मिळविला होता. यावेळी भाजपकडे वर्धा मतदारसंघात सर्वाधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती.
मात्र, मागील पाच वर्षांत या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाल्याने विद्यमान आमदार भोयर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर हिंगणघाट मतदारसंघात समीर कुणावार यांनीच उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. कुणावार यांचे काम पाहून पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर आर्वी मतदार संघात गेल्यावेळी पराभूत झालेले दादाराव केचे यांना यावेळी पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली यादी घोषीत झाली आहे. यात हिंगणघाट येथून अतुल वांदिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कॉँग्रेसचा वर्ध्याचा उमेदवार जाहीर होणे बाकी
भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. यात विद्यमान आमदार रणजित कांबळे, अमर काळे यांना अनुक्रमे देवळी व आर्वी मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, वर्धा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. येथे माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचे चिंरजीव शेखर शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच आघाडीच्या वाट्यात राष्ट्रवादीला गेलेल्या हिंगणघाट मतदार संघातही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. येथे माजी आमदार राजू तिमांडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी हे प्रबळ दावेदार आहेत.