वडिलांच्या चौदावीला केला देहदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:01 AM2018-12-24T00:01:34+5:302018-12-24T00:02:57+5:30
माणसाच्या मृत्यूनंतरही विचार आणि कार्यातून तो सर्वांच्या स्मरणात असतो. त्यामुळे मृत्यूनंतर आपला देह पंचतत्वात विलीन करण्यापेक्षा इतरांसाठी या देहाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने १८ सदस्यांनी मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला. निमित्त होते वडिलांच्या चौदावीच्या कार्यक्रमाचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : माणसाच्या मृत्यूनंतरही विचार आणि कार्यातून तो सर्वांच्या स्मरणात असतो. त्यामुळे मृत्यूनंतर आपला देह पंचतत्वात विलीन करण्यापेक्षा इतरांसाठी या देहाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने १८ सदस्यांनी मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला. निमित्त होते वडिलांच्या चौदावीच्या कार्यक्रमाचे. सामाजिक दायित्वातून केलेला हा संकल्प आदर्श ठरला आहे.
स्थानिक प्रतापनगरातील रहिवासी वसंतराव गोविंदराव जाधव (८२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यामुळे जाधव परिवाराच्यावतीने संत नामदेव मठात चौदावीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात जाधव परिवारासह त्यांच्या नातेवाईकांनी मरणोपरांत देहदानाचा संकल्प करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. यावेळी शासकीय रुग्णालयातील अवयवदान समन्वयक प्रफुल्ल काकडे यांनी अवयवदानाचे महत्त्व विशद केले. आपल्या देहाचा उपयोग समाजातील गरजू व पीडित व्यक्तीस व्हावा, ही सामाजिक भावना मनात बाळगून देहदानाचा संकल्प केला. याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनीही सहकार्य केले. समाजात अवयवदानाची संकल्पना रुजावी व गरजूंना त्याचा लाभ मिळून त्यांच्या जीवनात आनंदाची पेरणी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, याकरिता हा छोटासा प्रयत्न आहे, असे मत देहदानाचा संकल्प करणाऱ्यांनी व्यक्त केले.
यांनी केला देहदानाचा संकल्प
देहदानाचा संकल्प करणाºयांमध्ये वसंतराव जाधव यांच्या पत्नी शकुंतला, मुलगा संजय, प्रविण, प्रशांत व स्नुषा रिना, ज्योती व नंदा यांच्यासह सुधाकर भिसे, अर्चना भिसे, माधुरी बिडवाईक, वैष्णवी बिडवाईक, संजय चुन्ने, अश्विनी चुन्ने, आशीष मोहाळे, भाग्यश्री मोहाळे, विशाखा मोहाळे, सीमा झाडे, दीपक शिंदे आदींचा समावेश आहे.