कोट्यवधींचा दैनंदिन व्यवहार ठप्प
By admin | Published: November 10, 2016 12:52 AM2016-11-10T00:52:51+5:302016-11-10T00:52:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी भ्रष्टाचार रोखणे व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ऐतिकासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला.
बाजारपेठ थंडावली : ५००, १००० च्या नोटा हातात घेऊन सुट्या पैशांसाठी नागरिकांची लगबग
प्रशांत हेलोंडे वर्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी भ्रष्टाचार रोखणे व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ऐतिकासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला. या निर्णयाचे बरेच दूरगामी फायदे असून सर्वस्तरातून त्याचे स्वागत होत आहे. असे असले तरी सामान्यांचा विचार करताच ‘रूट लेव्हल’चा विचार शासनाने केला नसावा काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मंगळवारी सायंकाळी हा निर्णय धडकताच शेतकरी, व्यापारी व सामान्यांना धडकी भरली. बुधवारी सर्वांचीच तारांबळ उडाली. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द म्हटल्यानंतर बाजारपेठा चांगल्याच थंडावल्या होत्या. थोडेबहुत व्यवहार झाले; पण जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराला एकदम खीळ बसल्याचेच दिसून आले.
केंद्र शासनाने अकस्मात निर्णय जाहीर करीत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्दबातल ठरविल्या. हा निर्णयही लगेच मंगळवारी रात्री १२ वाजतापासून लागू करण्यात आला. सामान्यांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलण्याकरिता ५० दिवसांचा अवधी देण्यात आला; पण उद्यापासून काही दिवस व्यवहार कसे करायचे, हा यक्ष प्रश्न सर्वांना चिंतेत टाकत असल्याचे जाणवले. मंगळवारी सायंकाळी निर्णय धडकताच जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी एटीएम केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली. ‘कॅश ट्रान्सफर मशीन’च्या समोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात पाचशे, हजार रुपयांच्या नोटा दिसत होत्या. बुधवारी बँका आणि एटीएम बंद राहणार असल्याने सर्वांचीच ही लगबग दिसून येत होती. प्रत्येक जण मंगळवारी रात्रीच बँकेत रांगा लावून पैसे जमा करण्याच्या भानगडीतून वाचण्यासाठी कॅश ट्रान्सफर मशीनसमोर रांगा लावून उभे असल्याचे दिसून आले. शक्य होईल तेवढे पैसे बँकेत जमा करायचे आणि धास्ती दूर करायची, असा प्रयत्न प्रत्येक जण करीत होते.
मंगळवारी रात्रीच हा निर्णय सबंध देशात लागू करण्यात आल्याने दुसऱ्या दिवशीचे व्यवहार ठप्प होणार, हे निश्चित होते. त्या प्रमाणेच बुधवारी शहरातील बाजारपेठेचे चित्र होते. सकाळी भाजी बाजारामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांचीही गोची झाली. शेतकऱ्यांनी नित्याप्रमाणे आपला शेतमाल बाजारात आणला; पण खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार कसे, हा प्रश्नच होता. व्यापाऱ्यांकडे ५००, १००० रुपयांच्या नोटा होत्या; तर शेतकऱ्यांना त्या नको होत्या. यासाठी मग, व्यापारी, दलालांना शेतकऱ्यांना समजावून सांगावे लागले. अन्यथा शेतमाल परत नेण्याखेरीज पर्याय नव्हता. परिणामी, काही शेतकऱ्यांनी ५००, १००० रुपयांच्या नोटा स्वीकारत शेतमाल विकला. बुधवार असल्याने अधिक प्रमाणात शेतमाल नव्हता; पण गुरूवारी व्यापारी, दलाल आणि शेतकऱ्यांची खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना मोठीच कसरत होणार आहे. प्रसंगी व्यवहारच ठप्प पडण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठीही सामान्यांची तारांबळच उडाल्याचे दिसून आले. गॅस सिलिंडर वितरकांनी आपल्या केंद्रापर्यंत आलेल्या ग्राहकांकडून ५००, १००० रुपयांच्या नोटा स्वीकारत सिलिंडर वितरित केले; पण घरपोच सिलिंडर घेऊन जाणाऱ्या कर्मचारी, वाहन चालकांनी ही ‘रिस्क’ घेतली नाही. ग्राहकांना १०० रुपयांच्या नोटा द्या, अन्यथा सिलिंडर दिले जाणार नाही, असेच सांगितले जात होते. यामुळे ग्राहकांना सुटे पैसे द्यावे लागले.
पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल पंप, सरकारी रुग्णालये, बसस्थानक, रेल्वेस्थानक, केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत सहकारी ग्राहक संस्था, राज्य सरकारी दूध विक्री केंद्रे, स्मशान व दफनभूमी या ठिकाणी मंगळवारपासून ७२ तास ५००, १००० रुपयांच्या नोटांवर व्यवहार होतील, असे सांगितले. असे असले तरी सुटे पैसे येणार कुठून, असा प्रश्न उपस्थित होत होता. बुधवारी सकाळपासून सर्वत्र प्रत्यक्ष परिणामच पाहावयास मिळाले. शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहन धारकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. प्रत्येकाच्या हातात ५००, १००० रुपयांच्या नोटा दिसून येत होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुटे पैसे द्यायचे कुठून, असा प्रश्न पेट्रोल पंप धारक व तेथील कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला होता. दिवसभर पेट्रोल विक्री दरम्यान वादविवाद आणि हमरी-तुमरी होत असल्याचेच पाहावयास मिळाले. सरकारी रुग्णालयांमध्ये ५००, १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे नमूद असले तरी तेथे एवढ्या रकमेची गरज पडत नाही. शिवाय सरकारी रुग्णालयांमध्ये सामान्य, गोरगरीब नागरिकांचीच अधिक गर्दी असते. परिणामी, या ठिकाणी विशेष झुंबड दिसून आली नाही. बसस्थानक, रेल्वे स्थानकांवर तिकीटांसाठी ५००, १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात होत्या; पण त्यालाही मर्यादा होत्या. वर्धा रेल्वे स्थानकावर आरक्षित व अनारक्षित तिकीट खिडकीमधील कर्मचाऱ्यांना काही वेळाने सुटे पैसे देणेच कठीण झाले होते. यामुळे प्रसंगी १०००, ५०० रुपयांच्या नोटा नाकाराव्या लागल्या. बसमध्येही वाहकाकडे सुटे पैसे नसल्याचा प्रत्यय आला. प्रसंगी प्रवाशांच्या तिकीटामागे सुटे पैसे लिहून देण्याशिवाय पर्याय नव्हता. यातही दोन ते तीन प्रवासी मिळून पैसे देण्याचा प्रकार दिवसभर घडत होता.