आठ हजार हेक्टरचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:16 PM2018-02-14T22:16:43+5:302018-02-14T22:17:01+5:30
ऑनलाईन लोकमत
वर्धा : आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रविवारपासून बरसलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील तब्बल १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. यातील ७ हजार ५५२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ६० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. परिणामी, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
ढगाळ वातावरणाचे रुपांतर रविवारी अखेर अवकाळी पावसात झाले. रविवारी व सोमवारी मुसळधार पाऊस आणि गारपिटीने अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढले. अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक तडाखा देवळी, आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्याला बसला आहे. रविवारी सर्वत्र अवकाळी पावसाचे आगमन झाले तर सोमवारी देवळी, आर्वी व कारंजा तालुक्यात तुफान गारपीट झाले. यानंतर मंगळवारी आष्टी तालुक्यातही मुसळधार पावसासह तुरळक गारपीट झाले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आर्वी तालुक्यातील पिंपळझरी हे गाव बेचिराख झाले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गारपिटीमुळे ग्रामीण भागातील कवलारू तथा मातीच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मंगळवारी सुटी असली तरी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांनी संयुक्तरित्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची काही गावांत पाहणी केली. देवळी तालुक्यातील आठ गावांची मंगळवारी पाहणी करण्यात आली होती. यानंतर बुधवारी सकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून सर्वेक्षण तथा पंचनामे केले जात आहेत.
आर्वी तालुक्यातील एकूण ७४ गावांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा जबर तडाखा बसला आहे. तालुक्यात एकूण १ हजार ५८९ हेक्टरमधील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यात ६४६ हेक्टरमधील गव्हाचे पीक झोपले असून ७७३ हेक्टरमधील चणा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय १११ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे पीक बाधित झाले आहे. यासह टमाटर, मिरची, वालाच्या शेंगा, वांगी, पालक, सांभार तथा अन्य पालेभाज्यावर्गीय पिकांचे नुकसान झाले. फळबाग क्षेत्रातील तब्बल ५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यात अनेकांच्या बागांतील संत्रा व मोसंबीचा जमिनीवर सडाच पडल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आर्वी तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
देवळी तालुक्यातील ४९ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात १७२३.२० हेक्टर क्षेत्र बाधित असून ७३१.८० हेक्टर क्षेत्र ३३ टक्केच्या आत तर ९९१.४० हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले. हरभरा पिकाचे ५०५ हेक्टर ३३ टक्केच्या आत व ६५३ हेक्टर पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असून ११५८ हेक्टर हरभरा पिकाचे नुकसान झाले. १७८ हेक्टरमधील गव्हाचे ३३ च्या आत तर २९६.४० हेक्टरचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले असून एकूण ४७४.४० हेक्टर गव्हाचे नुकसान झाले. भाजीपाला पिकांचे एकूण ८४.९० हेक्टर क्षेत्र तालुक्यात आहे. यातील ४८.८० हेक्टर ३३ टक्केच्या आत तर ३६ हेक्टर क्षेत्र ३३ टक्केपेक्षा अधिक बाधित झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. फळबागांचे ६ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी राऊत यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील ३ हजार २४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यातील १६०० हेक्टरमध्ये गहू तर ११०० हेक्टर क्षेत्रातील चणा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय ५०० हेक्टर क्षेत्रातील कापूस शेतातच ओला झाला. तालुक्यात संत्रा पिकचे ४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली. पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण तालुक्यात अद्याप सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
कारंजा तालुक्यात दोन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातील गहू, चणा, कापूस, तूर तथा संत्रा, मोसंबी आदी पिकांचे वर्गीकरण अद्याप करण्यात आले नाही. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ४२ गावे प्रभावित झाल्याची माहितीही कृषी विभागाने दिली. जिल्ह्याच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग मात्र सायंकाळपर्यंतही माहिती देऊ शकला नाही. यामुळे तो कोमात असल्याची चर्चा होती.
पिंपळधरीच्या ग्रामस्थांना तत्काळ मदत
आर्वी तालुक्यातील पिंपळधरी येथील घरांची पडझड झालेल्या ग्रामस्थांची जि.प. शाळा व अंगणवाडीत व्यवस्था करण्यात आली. रोहणा आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार केले तर जेवण, पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली. खासगी व्यापारी व सामाजिक संघटनांकडूनही मदतीचा ओघ होता. अंथरून, पांघरून तथा अनुदान स्वरूपात दहा किलो तांदूळ व पाच लिटर केरोसिन देण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांसह सर्वांनी पिंपळधरी येथे भेट देत पाहणी केली व ग्रामस्थांची विचारपूस केली.
सेलू, वर्धेत ३३ टक्केच्या आत नुकसान
वर्धा तथा सेलू तालुक्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले; पण अधिक गारपीट झाल्याचे वृत्त नाही. वर्धा व घोराड येथे तुरळक गारपीट झाले; पण यामुळे फारसे नुकसान झालेले नाही. वादळी वारा व पावसामुळे गहू जमिनीवर झोपला. यात सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले. ते भरपाईस पात्र ठरत नसल्याची माहिती वर्धेचे तालुका कृषी अधिकारी सुभाष मुडे व सेलूचे बाबूराव वाघमारे यांनी दिली. समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फारसा प्रभाव नसल्याचेही कृषी विभागाने सांगितले.