सिंचनासाठी धरणेही असमर्थ
By admin | Published: July 16, 2015 12:01 AM2015-07-16T00:01:43+5:302015-07-16T00:01:43+5:30
पावसाने दडी मारल्याने पाऊस येईपर्यंत तरी पिके कशीबशी जगावी, यासाठी सिंचनाखाली जमिनी असलेले शेतकरी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी करीत आहे.
शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव निम्न वर्धा व मदन कालव्यात सोडले पाणी
वर्धा : पावसाने दडी मारल्याने पाऊस येईपर्यंत तरी पिके कशीबशी जगावी, यासाठी सिंचनाखाली जमिनी असलेले शेतकरी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी करीत आहे. बोर प्रकल्प सोडून कोणत्याच प्रकल्पात पाणी नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निम्न वर्धा आणि मदन प्रकल्पातून कालव्याद्वारे पिकांसाठी थोडे फार पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. कपाशी व सोयाबीनला कसे जगवावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दुपारी तापत असलेल्या उन्हामुळे जमीन कोरडी पडत चालली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन वाळू लागले आहे. विहिरीद्वारे सिंचनाची सोय असलेले शेतकरी आपली पिके कशीबशी जगवित असले तरी कोरडवाहू शेतकरी मात्र हतबल झाले आहे. कालव्याद्वारे सिंचनाची सोय असलेले शेतकरी एक तरी पाणी कालव्यात सोडण्याची मागणी करीत आहे. परंतु पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे भाग असल्याने सिंचनासाठी सोडता येईल एवढे पाणी बोर सोडून कोणत्याही प्रकल्पात नसल्याचे सिंचन विभागाने स्पष्ट केले होते. परंतु सिंचनासाठी पाण्याची मागणी आणि जिल्हाधिकारी यांचे आदेश यामुळे निम्न वर्धा प्रकल्पात १० क्यूसेक तर मदन धरणातूनही काही प्रमाणात पाणी सोडण्यात आले. असले तरी सिंचनासाठी प्रकल्प सध्या असमर्थ ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतकरी सिंचनासाठी पाण्याची मागणी करीत आहे. परंतु तितकासा जलसाठा उपलब्ध नाही. परंतु गरज आणि जिल्हाधिकारी यांचा आदेश लक्षात घेता निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्यातून १० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेले पाणी वाया जाऊ नये एवढीच सध्या अपेक्षा आहे.
- बी. एम. राहाटे, कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प(कालवे विभाग)
शेतकरी वर्र्गानेही सहकार्य करण्याची गरज
जिल्ह्यात कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा-बोथली, उमरी, टेंभरी, आंजी(बो.), दहेगाव(गोंडी), कुऱ्हा, रोठा-१, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हरासी, टाकळी(बो.) असे एकून २० सिंचन तलाव आहेत. यातील केवळ कवाडी तलावातून सिंचनासाठी १० टक्के पर्यंत पाणी सिंचनासाठी सोडले जाऊ शकते, असे अभियंता मेश्राम यांनी सांगितले.
शेतकरी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी करीत आहे. परंतु पाऊस केव्हा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे साठ्यात असलेले पाणी खूपच मौल्यवान आहे. विशेष म्हणजे शेतकरी आपापसातच पाण्यासाठी वाद घालत आहे. सोडलेले पाणी वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी सोडलेले नाही. शेतकऱ्यांनीही सिंचन विभागाला सहकार्य करणे गरजेचे असलेचे मेश्राम यांनी सांगितले.
जिल्ह्यात एकूण १५ लहान मोठे सिंचन प्रकल्प आहे. यातील बहुतेक प्रकल्पांची स्थिती अतिशय दयनिय असून त्यांनी गाठलेला तळ अद्यापही वर आलेला नाही. गतवर्षीच्या या कालावधीतील पाणीसाठ्याशी आताच्या स्थितीची तुलना करता काहीच प्रकल्प सोडता बाकी प्रकल्पात खूपच कमी जलसाठा उपलब्ध आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला बोर प्रकल्पात आजच्या स्थितीत २६.२२ दलघमी जलसाठा असून गतवर्षी हा साठा ३९.१७ एवढा होता. पोथरा प्रकल्पात सध्या २.६८ दलघमी एवढा साठा असून गतवर्षी तो ३.२२ दलघमी एवढा होता. डोंगरगाव प्रकल्पात सध्या ०.९१ दलघमी साठा आहे. गतवर्षी येथे १.०२ दलघमी जलसाठा उपलब्ध होता. मदन प्रकल्पात सध्या २.५६ दलघमी एवढा साठा असून गतवर्षी तो २.७० दलघमी एवढा होता. लाल नाला प्रकल्पात यंदा १.४८ दलघमी जलसाठा असून गतवर्षी हा जलसाठा ४.६६ दलघमी एवढा होता. नांद प्रकल्पात सध्या ४.६६ दलघमी साठा उपलब्ध असून मागील वर्षी येथे ९.८३ दलघमी जलसाठा होता. निम्न वर्धा प्रकल्पात सध्या ३३.३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून गतवर्षी हा साठा ५१.९० दलघमी एवढा होता. सुकळी लघु प्रकल्पात ५.३७ दलघमी जलसाठा असून गतवर्षी तो ५.६४ दलघमी एवढा होता.
एकीकडे ही स्थिती असताना पंचधारा, मदन उन्नई, वडगाव, अप्पर वर्धा, वर्धा कार नदी, बेंबळा आदी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा थोडा जास्त आहे. तरी बोर प्रकल्प सोडून कुठल्याही धरणात सिंचनापुरता पाणीसाठा नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. तसेच धाम प्रकल्पात पाणी असले तरी ते पिण्यासाठी राखीव असल्याचेही सांगितले आहे.