वादळी पावसाच्या तडाख्याने पिकांचे नुकसान
By admin | Published: September 20, 2015 02:32 AM2015-09-20T02:32:50+5:302015-09-20T02:32:50+5:30
गत चार दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतकरी हतबल : हातात आलेले पीक जाण्याची भीती
समुद्रपूर : गत चार दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातात येणारे पीक भूईसपाट होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पिके बऱ्यापैकी बहरली होती; पण अचानक वादळी पावसाने थैमान घालून पिकांची धुळधान केली आहे. तालुक्यात कपाशी पिकांच्या पात्या गळाल्या असून वादळामुळे पऱ्हाटी पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. सोयाबीन पीक नुकतेच सवंगण्यावर आले होते. शेंगा भरलेल्या सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याचेही दिसून येत आहे. यामुळे सोयाबीनही हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनानी शेतकऱ्यांच्या नुकसानीची बाब गंभीरतेने घेणे गरजेचे झाले आहे.
काही दिवसांत कपाशीचे हमीभाव जाहीर होतील. यात गतवर्षी -प्रमाणेच ५० रुपये वाढ देऊन थट्टा केल्यास शेतकऱ्यांना जगणेच कठीण होणार आहे. यामुळे कापसाला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव देत शासनानेच खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
हमीभाव वाढल्यास कमी होणार कर्जाचा भार
कृषिप्रधान देशात शेतकरीविरोधी व व्यापारी हिताचे धोरण राबवित कापसाचा हमीभाव जाहीर केला जातो. यात प्रत्येक वर्षी ५० ते १०० रुपये वाढ करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईतून बाहेर निघत नसल्याचा आरोप होत आहे. गतवर्षी ५० रुपयेच वाढ करीत ४०५० रुपये हमीभाव जाहीर केला. यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. शेतकऱ्यांना तारायचे असेल तर शेतकऱ्यांना हमीभावात भरीव वाढ देणेच गरजेचे झाले आहे.
‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ अशी म्हण प्रचलित होती; पण या म्हणीला अर्थच राहिला नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करीत अल्प भावात पांढरे सोने खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. सोयाबीनलाही विशेष भाव मिळत नाही. यामुळे शेतमालाचे हमीभाव वाढविणे गरजेचे आहे.