वाहीतपूर-पवनार मार्गावरील रपटा धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:01 PM2018-08-12T23:01:49+5:302018-08-12T23:02:19+5:30
तालुक्यातील वाहितपूर गावातून पवनारला एमआयडीसी पुलामार्गे जाणाऱ्या रस्त्याचे अर्धा कि़मी.चे डांबरीकरण अपूर्ण आहे. शिवाय गावाजवळील नाल्यावरील पुलाचा रपटा पुरामुळे वाहून गेल्याने येथून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. सदर रपट्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील वाहितपूर गावातून पवनारला एमआयडीसी पुलामार्गे जाणाऱ्या रस्त्याचे अर्धा कि़मी.चे डांबरीकरण अपूर्ण आहे. शिवाय गावाजवळील नाल्यावरील पुलाचा रपटा पुरामुळे वाहून गेल्याने येथून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. सदर रपट्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांची आहे.
रपटा खचल्याने पुलाच्या दोन्ही बाजुला सुमारे १० फुट रुंद व ५ फुट खोलीची दरी तयार झाली आहे. वाहनचालकांना या मार्गाने ये-जा करताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. शिवाय साधे पायी जाणे ही धोक्याचे ठरत आहे.
या ठिकाणी दररोज छोट-छोटे अपघात होत आहेत. याच मार्गाने विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत असून रात्रीच्या सुमारास पुलाचा खचलेला भाग सहज दिसत नसल्याने एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण मिळत आहे.
संभाव्य धोका लक्षात घेता रपटा दुरूस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे तालुका सरचिटणीस संजय अवचट यांनी आ. डॉ. पंकज भोयर यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. येत्या काही दिवसात दुरूस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या मार्गासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कामाची झाली होती घोषणा
पवनार येथील अनेक शेतकऱ्यांची शेती वाहितपूर येथे आहे. त्यांना नाल्यातून वाट काढत किंवा डोंग्याच्या सहाय्याने जावे लागते ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पवनार ते वाहितपूर दरम्यान पूल व रस्ता बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी पनवार येथे केली होती. अनेक शेतकºयांनी या निर्णयाचे स्वागतही केले होते. मात्र अजून काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.