कपड्याच्या गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 09:38 PM2019-05-05T21:38:48+5:302019-05-05T21:39:22+5:30
विठोबा चौकातील सुरेश बसंतानी यांच्या मालकीच्या कपड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यात मोठ्या प्रमाणात कपडे जळून कोळसा झाल्याने त्यांचे सुमारे २० लाखोंचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : विठोबा चौकातील सुरेश बसंतानी यांच्या मालकीच्या कपड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यात मोठ्या प्रमाणात कपडे जळून कोळसा झाल्याने त्यांचे सुमारे २० लाखोंचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसात आग लागल्याची ही तिसरी घटना आहे.
प्राप्त माहितीनुसार, विठोबा चौक परिसरात सुरेश बसंतानी यांच्या मालकीचे कपड्याचे दुकान व तेथेच कपड्याचे गोदाम आहे. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास याच गोदामातून धूर निघत असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी आरडा-ओरड केल्याने घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. आग लागल्याचे लक्षात येताच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न सुरू झाले. दरम्यान घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच न.प.च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. शिवाय आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोपर्यंत आगीने गोदामातील संपूर्ण कपड्यांना आपल्या कवेत घेतले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील व्यावसायिकांनीही सहकार्य केले. या आगीत चादर, सतरंजी, पडदे, गालीछा आदी साहित्य जळून कोळसा झाल्याने व्यावसायिक बसंतानी यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी अशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे दोन दिवसातील ही तिसरी घटना असून यापूर्वी विठोबा चौकातील खिलवानी यांच्या दुकानाला तर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या निवास स्थानाच्या मागील भागात आग लागली होती.