वादळामुळे १० गावांत काळोख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:14 AM2018-06-06T00:14:42+5:302018-06-06T00:14:42+5:30
सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला. आकोली येथे वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली. याच काळात भूगाव व देवळी येथील १३२ के.व्ही. वाहिनी बंद पडल्याने....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला. आकोली येथे वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली. याच काळात भूगाव व देवळी येथील १३२ के.व्ही. वाहिनी बंद पडल्याने तब्बल १० गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथे काळोखाची स्थिती असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
बंद पडलेला पुरवठा सुरळीत करण्याकरिता महावितरणची यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात त्यांना अपयश आल्यास या भागातील नागरिकांना रात्र अंधरात काढावी लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वर्धा शहरासह आसपासचा परिसर अंधारात गेला आहे. या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्धा शहर आणि परिसराला वीज पुरवठा करणारी महापारेषणची भूगाव- देवळी १३२ के व्ही. वाहिनी बंद पडली. परिणामी महावितरणच्या देवळी, भिडी, अडेगाव, सावंगी, मदनी, खरंगणा (गोड)े, म्हाडा कॉलनी, विद्युत भवन, वायफळ, वायगाव येथील वीज उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद झाला. याचा फटका या भागातील सुमारे ५० हजार वीज ग्राहकांना बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम उरकुडे यांनी हालचाल करून पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. वर्धा शहराला सेलू येथून तर मदनी, खरांगणा या उपकेंद्रावरील वीज ग्राहकांसाठी सेवाग्राम येथून वीज पुरवठा घेण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याचे कळविण्यात आले आहे.
आकोली येथे वीज कोसळली
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यात बऱ्याच ठिकाणी पावसासह सोसाट्याचा वारा आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आकोली परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. याच वेळी सुधाकर सायरे यांच्या शेतात वीज कोसळली. यात दोन गाई व एक गोऱ्हा ठार झाला. यासह चिकणी (जामणी ) परिसरात पावसासह असलेल्या वादळाने चांगलेच नुकसान केले.