भूमिपूजनास ‘तारीख पे तारीख’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 11:38 PM2017-08-29T23:38:35+5:302017-08-29T23:39:40+5:30
महात्मा गांधींचे विचार जगाला प्रेरणादायी आहेत. ते तरूण मनावर बिंबविता यावे म्हणून गांधी फॉर टुमारो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास आला.
प्रशांत हेलोंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधींचे विचार जगाला प्रेरणादायी आहेत. ते तरूण मनावर बिंबविता यावे म्हणून गांधी फॉर टुमारो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास आला. चार वर्षांपासून यासाठी विविध प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. प्रशासकीय मंजुरी, निधीची मान्यता, निविदा, कंत्राट देण्याचे सोपस्कार पूर्ण झाले; पण अद्याप भाजपच्या मंत्र्यांना भूमिपूजनासाठी मुहूर्तच गवसला नाही. कंत्राटदार कंपनीला मात्र कामे उरकण्याची लगीनघाई सुटली आहे.
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सेवाग्राम, पवनार, वर्धा तथा महात्मा गांधी आश्रम परिसरात विविध कामे मंजूर आहेत. या कामांसाठी आलेल्या तीन निवीदांपैकी जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबईला हे कंत्राट देण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १४४ कोटी ९९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचे वर्क आॅर्डरही देण्यात आले आहे. असे असले तरी अद्याप कुठल्याही कामांचे रितसर भूमिपूजन करण्यात आलेले नाही. यामुळे कंत्राटदार कंपनीने मंत्र्यांच्या किमान मौखिक सूचनांची तरी प्रतीक्षा वा विचारणा करणे क्रमप्राप्त होते; पण कुठल्याही सूचना नसताना कामे सुरू करण्यात आलीत. वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील पेट्रोल पंपाच्या बाजूला भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम कंत्राटदार कंपनीने सुरूही केले, हे विशेष! वास्तविक, या कामाचे डिझाईन मंजूर झाले नाही. यामुळे बदलाचे संकेत आहेत. तत्पूर्वीच काम सुरू झाल्याने खर्च व्यर्थ ठरणार आहे.
गांधी फॉर टुमारो प्रकल्पासाठी एकूण २६६ कोटी ५३ लाख ७५ हजार रुपयांच्या आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. यातील १४४ कोटी ९९ लाखांची कामे पहिल्या टप्प्यात होणार आहे. यासाठी ९ आॅगस्ट क्रांती दिनी भूमिपूजन होणार होते. शिलान्यास केला; पण पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करायचे म्हणून तो कार्यक्रम रद्द केला गेला. यानंतर स्वातंत्र्य दिनी भूमिपूजन होणार, अशी हाकाळी पसरली; पण तो मुहूर्तही टळला. आता भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला कधी सुरूवात होणार, हा प्रश्न अधांतरीच आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री तथा पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘लोकमत’ वृत्ताने उडाला गोंधळ
डिझाईन फायनल होण्यापूर्वीच कंत्राटदार कंपनीने काम सुरू केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २८ आॅगस्ट रोजी प्रकाशित केले. हे वृत्त उमटताच कंत्राटदार कंपनीसह अधिकाºयांमध्ये गोंधळ उडाला. डिझाईन मंजूर नसल्याची बाब गोपनीय आहे म्हणत अधिकाºयांनी एकमेकांनाच विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंते तथा कंत्राटदार कंपनीची बैठक झाली. यातही सदर विषयावर खलबतं झाल्याचे सांगण्यात आले.
सेवाग्राम विकास आराखड्याबाबत आज बैठक घेण्यात आली. यात २८ कोटी रुपयांच्या कामांचा आरखडा मंजूर करण्यात आला. शिवाय ३० कोटी रुपयांच्या कामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली ही कामे आहेत. डिझाईन मंजुरी नसल्याची कल्पना नाही.
- अरविंद टेंभुर्णे, जिल्हा नियोजन अधिकारी, वर्धा.