शाळा पाडण्यासाठी ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:47 PM2019-07-08T21:47:56+5:302019-07-08T21:48:11+5:30

शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीने जुनी धोकादायक इमारत पाडण्यासाठी २०१६ पासून वारंवार शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात अनुचित घटना घडण्याची शक्यता शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.

'Date to date' for the construction of schools | शाळा पाडण्यासाठी ‘तारीख पे तारीख’

शाळा पाडण्यासाठी ‘तारीख पे तारीख’

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न : वरिष्ठांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीने जुनी धोकादायक इमारत पाडण्यासाठी २०१६ पासून वारंवार शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात अनुचित घटना घडण्याची शक्यता शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीची विद्यार्थीसंख्या यावर्षी १६ इतकी आहे. २० वर्षांपूर्वी येथे पुनर्वसनमधून प्राथमिक शाळेचे बांधकाम करण्यात आले होते. ही इमारत क्षतिग्रस्त झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी नवीन शाळा बांधून दिली. त्याचवेळी जुनी शाळेची इमारत पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने व मुख्याध्यापकाने संयुक्त प्रस्ताव पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिला. त्यांनी सदर प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिकला पाठविला. मात्र, यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
जुन्या इमारतीच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. याठिकाणी चिमुकले विद्यार्थी पाणी पितात. अशावेळी पावसाच्या पाण्याने शाळेची भिंत पडली तर मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश परतेती, मुख्याध्यापक राजू चौरेवार यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, वरिष्ठांनी जुनी शाळा पाडण्यासाठी मंजुरीच दिली नाही. त्यामुळे प्रकरण थंडबस्त्यात पडून आहे.
याप्रकरणी सोमवारी शिक्षण विस्तार अधिकारी आर.एच. खान यांनी वरिष्ठांशी संवाद साधला असता, जुन्या शाळेच्या साहित्याचा लिलाव करण्यासाठी व शाळा इमारत पाडण्यासाठी पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग या सर्वांकडून प्रक्रिया पूर्ण झाली की शाळा पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मागील दोन वर्षांपासून शिक्षण विभागाच्या डुलक्या सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची पालकांची मागणी आहे.

शाळा जीर्ण झाली. पाडण्यासाठी दोन वर्षांपासून वारंवार प्रस्ताव दिले. उडवाउडवीची उत्तरे देऊन शिक्षण विभाग वेळ मारून नेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी लवकर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
- सतीश परतेती, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, नवीन आष्टी.

प्रस्ताव मंजूर झाल्यावर लिलावाची किंमत काढून अद्यापपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे शाळा पाडण्याचा विषय प्रलंबित आहे. याविषयी पाठपुरावा सुरूच आहे.
- प्रमोद देशपांडे, गटशिक्षणाधिकारी, आष्टी (शहीद)

Web Title: 'Date to date' for the construction of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.