कृतीतून दत्तकग्राम आमलाची ‘नाम’वंत वाटचाल

By Admin | Published: July 7, 2016 02:15 AM2016-07-07T02:15:04+5:302016-07-07T02:15:04+5:30

नाम फाऊंडेशनने सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतलेल्या आमला गावात गत आठ महिन्यांत विविध कामे करण्यात आली.

Dattagram Amla's 'Namavant' walk through action | कृतीतून दत्तकग्राम आमलाची ‘नाम’वंत वाटचाल

कृतीतून दत्तकग्राम आमलाची ‘नाम’वंत वाटचाल

googlenewsNext

गाव विकासाच्या कामांची पायाभरणी : नाम फाऊंडेशनच्या कार्याला लोकसहभागाची जोड
वर्धा : नाम फाऊंडेशनने सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतलेल्या आमला गावात गत आठ महिन्यांत विविध कामे करण्यात आली. यात ८ ते १० किमी अंतराच्या नाल्यांचे खोलीकरण, रूंदीकरण, तीन बंधाऱ्यांचा गाळ उपसा, १६०० मीटर नवीन नाल्याची निर्मिती, जोडगाव असलेल्या तिगाव येथे १४०० मीटर नवीन नाल्याची निर्मिती, बसस्थानकाचे सौंदर्यीकरण, प्रवाशांकरिता सिमेंट बाकडे आदींचा समावेश आहे. या कामांमुळे दत्तकग्राम आमलाची ‘नाम’वंत वाटचाल सुरू असल्याचेच दिसते.
आमला गावातील कृष्णाजी महाराज मंदिर हे पंचक्रोशीत प्रसिद्ध व नावारूपास आलेले धार्मिक स्थळ असून दरवर्षी येथे यात्रा उत्सव होतो. यानिमित्त हजारो भाविक या उत्सवात सहभागी होतात. मंदिराकडे जाण्याची अडचण पाहता ग्रामस्थांनी सामूहिक निर्णय घेतला. परिसरातील १० ते ११ शेतकऱ्यांनी मंदिराकडे जाणारा रस्ता तयार व्हावा म्हणून आपल्या शेतातील जागा उपलब्ध करून दिली. नाम फाऊंडेशनने या अंदाजे दीड किमी पांदण रस्त्याची निर्मिती केली. आमला गावाकडून पहाडाकडे जाणाऱ्या नवीन पांदण रस्त्यावर शेतात प्रवेश करण्यासाठी शेतकऱ्यांना सिमेंट पायलीचे पूल टाकून देण्यात आले. गावाजवळून वाहणारा नाला बूजवून दीड-दोन एकर जागेचे सपाटीकरण करून गावगोठा, शेणखत खड्डे व मुलांना खेळण्याकरिता क्रीडांगण तयार करण्यात आले.
जि.प. प्राथमिक शाळा व अंगणवाडीला सिमेंट पोल व लोखंडी जाळीचे कुंपण बसवून देण्यात आले. ग्रा.पं. समोरील जागेवर शहाबादी फरशी बसवून २० बाय ६० अर्थात १२०० स्केअर फुट जागेचे सौंदर्यीकरण करण्यात आले. ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिमेंटच्या आठ कचऱ्याकुंड्या ठेवण्यात आल्या. यात सुका कचरा साचवला जातो. ओला कचरा शेणखत्याच्या खड्ड्यात पुरण्याची सवय ग्रामस्थांना लावण्यात आली.
१५२ कुटुंबांच्या आमला गावातील प्रत्येक नागरिकाला वैद्यकीय दिलासा कार्डची सुविधा वैद्यकीय जनजागृती मंच यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली. या कार्डद्वारे रुग्णांना मोफत तपासणी व उपचार सेवा लागू झाली. याचा गावातील सर्वांना लाभ होत आहे. महिलांच्या रोजगाराचा विचार करता लेदर बॅग निर्मिती प्रशिक्षण देण्यात येत आहे. यातून रोजगार निर्मिती करून देण्याचे प्रयत्न सुरू आहे. गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या लहान-मोठ्या नाल्यांची (७००मीटर) दुरूस्ती करून स्वच्छतेला हातभार लावण्यात आला. विविध प्रजातीची ५०० रोपे लावण्याचा संकल्प केला आहे. गावात वृक्षलागवड सुरू आहे.
या मोहिमेत व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे व त्यांचे सहकारी, ‘नाम’चे आर्कि. रवींद्र पाटील, मनीष मिसाळ, सुरेश कांबळे, बा.दे. हांडे, मुरलीधर बेलखोडे, अरुण निमकर्डे, सरपंच मोहन इंगळे, उपसरपंच मंगला महल्ले, विठ्ठल इंगळे, सर्व ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रीतम महल्ले, गौरव इंगळे, अखिल भुजाडे, मयूर डोळसकर यांच्यासह ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Dattagram Amla's 'Namavant' walk through action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.