दप्तराचे नियम धाब्यावर
By admin | Published: July 12, 2017 01:58 AM2017-07-12T01:58:13+5:302017-07-12T01:58:13+5:30
दर्जेदार शिक्षणाच्या नावावर शिक्षणाचा व्यापार करणाऱ्या अनेक संस्था आज उदयास आल्या आहेत.
वजनाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : पालकांनी सतर्क राहून तक्रार करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दर्जेदार शिक्षणाच्या नावावर शिक्षणाचा व्यापार करणाऱ्या अनेक संस्था आज उदयास आल्या आहेत. त्यांच्या भव्यतेत आणि दिव्यतेने पालक भारावून जातात. त्यांच्या याच भारात शाळांकडून सक्ती करीत मुलांच्या पाठीवर दप्तराचा भार देत आहेत. उत्तम शिक्षणाच्या नावावर या संस्थांकडून चिमुकल्यांच्या पाठीवर दप्तराचा भार देताना मात्र नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले आहे. यावर कार्यवाही करण्याकडे येथील शिक्षण विभाग मात्र दुर्लक्ष करीत असून या बाबत पालकांनीही जागरूक राहणे गरजेचे झाले आहे. आज कॉन्व्हेंटच्या सर्वच शाळातून पुस्तकांची विक्री होत आहे. सर्वच पुस्तके आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. या पुस्तकांसोबत तेवढ्याच वह्याही विद्यार्थ्यांना देण्यात येतात. ही पुस्तके आणि वह्या या चिमुकल्यांच्या वयानुसार जास्तच असल्याचे दिसून येते. शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर देण्यात येत असलेल्या दप्तराच्या वजनाबाबत काही मापदंड दिले आहेत. येथे मात्र या मापदंडाची पुरती वाट लावल्याचे दिसून आले आहे. यावर कार्यवाही करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून एक पथक तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून जिल्ह्यात अद्यापही कार्यवाही झालेली नाही.
जिल्ह्यात ११६ कॉन्व्हेंट
सध्या प्रत्येक पालकांना आपला मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकावा असे वाटत असल्याने जिल्ह्यात कॉन्व्हेंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज स्थितीत जिल्ह्यात ११६ कॉन्व्हेंट असल्याची नोंद शिक्षण विभागात आहे. या व्यतिरिक्त ५०३ खासगी शाळा आहेत. या शाळांत दप्तराच्या नियमांचे उलंघन होत आहे.
विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तीन टक्केच वजन दप्तराचे असावे
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार साधाणत: विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तीन टक्के वजन त्याच्या दप्तराचे असणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात बऱ्याच शाळांत या नियमाला बगल देण्यात येत आहे. यावर कार्यवाही करण्यासंदर्भात सर्वांच्या नजरा शिक्षण विभागाकडे आहेत. मात्र या संदर्भात कोणत्याही पालकाने तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे.
काही शाळांत निम्मी पुस्तके घरीच
जिल्ह्यातील काही शाळांत विद्यार्थ्यांच्या पाठीवर असलेले ओझे कमी करण्याची सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांकडे असलेली निम्मी पुस्तके शाळेतच ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. हा उपक्रम इतर शाळांनीही राबविण्याची आवश्यकता आहे.
तपासणी पथकाची कार्यवाही शून्यच
दप्तराच्या वजनासंदर्भात शासनचा नियम येताच शिक्षण विभागाच्यावतीने एक पथक तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पथकाकडून प्रत्येक शाळेत जात दप्तराचे वजन करण्यात येणार आहे. ज्या शाळेत नियमाच उल्लंघण होत असल्याचे दिसून आले. त्या शाळेवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार होती. यात शाळेची परवानगी रद्द करण्यासंदर्भातही कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र जिल्ह्यात अशी कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे पथक निर्मितीवरही संशय निर्माण होत आाहे.