राधिका स्पेशल आईस्क्रीममध्ये आढळले मृत कीटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 AM2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:14+5:30
राधिका रेस्टॉरेंट प्रमुख मार्गालगत असून पार्किंग सुविधा नसल्याने येथे येणाऱ्या ग्राहकांना चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलिस आदिती मेडिकल परिसरात असतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून कधीही या हॉटेलवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राधिका रेस्टॉरेंटमधील ‘राधिका स्पेशल आईस्क्रिम’मध्ये चक्क मृत कीटक आढळून आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई केली.
शहरातील प्रमुख मार्गालगत राधिका रेस्टॉरेंट असून ते सुनीता सुनील मुरारका यांच्या मालकीचे आहे. शुक्रवारी राधिका रेस्टॉरेंटमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषद आटोपल्यानंतर आयोजकांनी भोजन ठेवले होते. भोजनानंतर पत्रकार बांधवांना राधिका स्पेशल आईस्क्रिम देण्यात आले. एका मराठी वृत्तपत्राचे पत्रकार हे आईस्क्रिम खात असताना त्यामध्ये मृत कीटक आढळून आले. या प्रकारामुळे या पत्रकारालाही धक्का बसला आणि राधिका रेस्टॉरेंटमध्ये एकच हल्लकल्लोळ झाला. पत्रकारांनी अन्न व औषध प्रशासनाला घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे लगेच ‘राधिका’त पोहोचले. यानंतर त्यांनी नमुना सहाय्यक व इतर अधिकाऱ्यांना पाचारण केले. अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान राधिका स्पेशल आईस्क्रिमचे नमुने विश्लेषणाकरिता घेतले. हॉटेलमालक मुरारका यांच्याकडे घडलेल्या प्रकाराविषयी विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवी करीत प्रकरण दडपण्याचा करण्याचा प्रयत्न केला. अधिकाºयांनी आढळून आलेल्या त्रुटींच्या आधारे किचनची तपासणी करीत हॉटेलमालकाला धारेवर धरले. हॉटेलच्या किचनमध्ये जाळे लोंबकळत होते. सर्वत्र अस्वच्छता होती. खाद्यपदार्थ तयार करणाºया कर्मचाºयांचाही पोषाखही अस्वच्छ होता. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापन थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचीच बाब पुढे आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रात्री ८ वाजतापर्यंत तब्बल दोन तास कारवाई केली. या कारवाईची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने इतर हॉटेल व्यावसायिकांचेही धाबे दणाणले होते. यापूर्वीही राधिका हॉटेलमधील छोला भटुरामधील काबुली चण्यात कीटक आढळून आले होते. मात्र, याची वाच्यता न झाल्याने हे प्रकरण दडपले गेले. शुक्रवारी घडलेल्या प्रकारामुळे राधिका हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे, नमुना सहायक संजय धकाते, अमित तृपकाने यांनी केली. या हॉटेलवर अहवालाअंती अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांना देऊन मागील अनेक दिवसांपासून राधिका रेस्टॉरेंट ग्राहकांच्या आरोग्याविषयी खेळत असल्याचा आरोपही आता नागरिकांतून होत आहे.
हॉटेलकडे पार्किंगची सुविधाच नाही, पालिका-पोलिसांची कृपादृष्टी
राधिका रेस्टॉरेंट प्रमुख मार्गालगत असून पार्किंग सुविधा नसल्याने येथे येणाऱ्या ग्राहकांना चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलिस आदिती मेडिकल परिसरात असतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून कधीही या हॉटेलवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
हॉटेलमधील आईस्क्रिमचे नमुने घेतले असून ते नागपूर येथे विश्लेषणाकरिता पाठविले आहेत. किचनमध्ये अस्वच्छता आढळल्याने हॉटेलमालकाला सुधारणा नोटीस बजावण्यात येणार आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर ‘राधिका’वर निलंबन अथवा दंडात्मक कारवाई केली जाईल.
रविराज धाबर्डे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, वर्धा