मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी
By admin | Published: May 29, 2015 01:56 AM2015-05-29T01:56:04+5:302015-05-29T01:56:04+5:30
केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारने मंगळवारी वर्षपूर्ती साजरी केली.
बोरधरण : केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारने मंगळवारी वर्षपूर्ती साजरी केली. सेलू तालुका काँग्रेस कमेटी आणि वर्धा विधानसभा युवक काँग्रेसने मात्र प्रतिकात्मक पुण्यतिथीद्वारे केंद्र शासनाच्या ‘अच्छे दिन’चा निषेध नोंदविला. याबाबत सेलूचे नायब तहसीलदार अजय झिले यांना निवेदन देण्यात आले.
निवडणुकीदरम्यान भाजपाचे आम्ही सत्तेत आल्यास १०० दिवसांत काळा पैसा विदेशातून परत आणू, कलम ३६० रद्द करू, प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात ३५ लाख रुपये जमा करू, महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ, दहशतवाद विरोधात कठोर कारवाई करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, शेती उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देऊन आधारभूत किमतीमध्ये वाढ करू अशी अनेक आश्वासने दिली होती. एक वर्षाचा कार्यकाळ लोटला असताना मोदी सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. यामुळे निवेदनाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करून देण्यात आले.
निवेदन सादर करताना माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, वर्धा विधानसभा युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोटे, मंगेश वानखेडे, सेलूचे सरपंच राजेश जयस्वाल, श्याम बोबडे पाटील, मारोतराव बेले, प्रमोद ढुमणे, पुरूषोत्तम नाईक, घनश्याम खंडागळे, गणेश सुरकार, खोडके पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)