दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:37 PM2018-04-11T23:37:09+5:302018-04-11T23:37:09+5:30
देवळी-वर्धा मार्गावरील संत छावरा शाळेजवळ दुचाकीला मागाहून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यामुळे समोरच्या दुचाकीवरील दोन्ही युवक ट्रकखाली आले. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/चिकणी (जामणी) : देवळी-वर्धा मार्गावरील संत छावरा शाळेजवळ दुचाकीला मागाहून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यामुळे समोरच्या दुचाकीवरील दोन्ही युवक ट्रकखाली आले. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडला. यात ग्रा.पं. सदस्य अक्षय नारायण बाळबुधे (२४) रा. पडेगाव याचा जागीच मृत्यू झाला तर अनिल महादेव कोकाटे (२३) रा. पडेगाव याचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला.
नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ९ वाजता अनिल कोकाटे व अक्षय बाळबुधे हे दोघेही वर्धा येथे कामावर जाण्याकरिता पडेगाव येथून दुचाकीने निघाले. दरम्यान, देवळी-वर्धा मार्गावर मागाहून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात नियंत्रण सुटल्याने दोघेही मागाहून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच २४ एबी ७०३१ च्या चाकाखाली आले. यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
दु:ख बाजूला सारून अनिलचे नेत्रदान
अपघातात मुलाचा मृत्यू झाला यामुळे कोकाटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला; पण हे दु:ख बाजूला सारून कोकाटे कुटुंबाने धाडसी निर्णय घेत अनिलचे नेत्रदान केले. येथील उपसरपंच नरेंद्र पहाडे हे मागील दहा वर्षांपासून नेत्रदान चळवळ राबवित आहेत. आजपर्यंत पडेगाव येथील २२ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. हाच वारसा जपण्याकरिता कोकाटे कुटुंबाने धाडसी निर्णय घेत पहाडे यांच्या पुढाकाराला प्राधान्य दिले. आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी (मेघे) येथे नेत्रदान प्रक्रिया पार पाडण्यात आली.
कुटुंबाचा आधार गेला
अक्षय बाळबुधे हा वर्धा येथे डॉ. जोगे यांच्या दवाखान्यात कार्यरत होता. शिवाय तो पडेगाव ग्रामपंचायतचा सदस्य होता. अत्यंत गरीब तथा आदिवासी कुटुंबातील असताना त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शिवाय अत्यंत सालस आणि होतकरू होता. कुटुंबातील तो कमविता असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबच उघड्यावर आले. अनिल कोकाटे हा शिक्षण घेत शेतीचे काम करीत होता. दोन्ही युवकांच्या मृत्यूमुळे कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोक व्याप्त आहे.